प्रतिनिधी / बेळगाव
लाकडे आणण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱया नराधमाला तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र आणि पोक्सो न्यायालयाने 10 वर्षांचा कारावास आणि 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. बसवराज हेमरेड्डी जग्गापूर (वय 31, रा. हिरेकोप्प एस. के.) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
बसवराज जग्गापूर हा आपल्या नातेवाईकांकडे हलगत्ती (ता. रामदुर्ग) या गावी राहत होता. त्याने 24 मे 2017 रोजी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने आरडाओरड केल्याने तो पळून गेला. त्यानंतर तपास अधिकारी बी. एस. मंटूर यांच्या नेतृत्वाखाली सीपीआय जी. बी. गौडर यांनी त्याच्यावर गुन्हा नोंदविला. त्यानंतर त्याला अटक केली.
येथील तिसरे अतिरिक्त व पोक्सो न्यायालयात त्याच्या विरोधात दोषारोप दाखल केले. त्या ठिकाणी 26 साक्षी, 34 कागदोपत्री पुरावे आणि 9 मुद्देमाल तपासण्यात आले. त्यामध्ये बसवराज दोषी आढळला. त्यामुळे न्यायाधीश मंजाप्पा अण्णयण्णावर यांनी ही शिक्षा सुनावली आहे.
या खटल्यात सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले. अत्याचार झालेल्या त्या अल्पवयीन मुलीला 2 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत.