इचलकरंजी / प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवत अप्पर सत्र न्यायाधिश आर. एन. बावनकर यांनी संशियत मेहबुब सरदार बैरागदार (वय 55 रा. पिराचा माळ) यास दोन वर्षे सश्रम कारावास व 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, गावभागातील पिराचा माळ परिसरात संशयित मेहबुब बैरागदार याचे किराणा दुकान आहे. त्या दुकानात पिडीत अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी जात होती. सदर पिडीत मुलीवर संशयिताने 27 मे 2020 रोजी व तत्पूर्वी दोन-तीन वेळा लैंगिक अत्याचार केले. या घटनेची खात्री झाल्यानंतर पिडीत मुलीच्या वडीलांनी गावभाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करुन तपासी अधिकारी पोलिस उपनिरिक्षक रोहन पाटील यांनी संशयित बैरागदार याच्याविरुध्द येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी होऊन निकाल देण्यात आला. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार व तपासी अधिकारी यांची साक्ष नोंदविण्यात आली. त्याचबरोबर महत्वाचे पुरावे व कागदपत्र बचाव पक्षाने मान्य केल्याने गुन्हा शाबितीकरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरले. सरकारी वकिल एच. आर. सावंत-भोसले यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य मानत अप्पर सत्र न्यायाधिश आर. एन. बावनकर यांनी संशयित मेहबुब बैरागदार यास दोषी धरुन भादंवि कलम 354 व पोक्सो कलम 4 प्रमाणे 2 वर्षे सश्रम कारावास व 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
दरम्यान, न्यायालयाने दिलेला निकाल अमान्य असल्याने या निकालास स्थगिती मिळावी असा अर्ज न्यायालयासमोर सादर केला. सदरचा अर्ज मंजूर करुन न्यायालयाने बैरागदार याच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या शिक्षेच्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार, अशी माहिती संशयितांचे वकिल अॅड. मेहबुब बाणदार यांनी दिली.