प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांच्या आकडेवारीत वाढ होत असली तरी रिकव्हरी रेट दिलासा देणारा आहे. तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे. सध्या जिल्हय़ात उपचारार्थ रुग्ण 895 दिसत असली प्रत्यक्ष दवाखान्यात उपचार घेणारे रुग्ण 309 एवढेच आहे. कोरोना केअर सेंटर ओस पडलेली असून अहवाल आकडेवारीनुसार 586 रुग्ण होम आयसोलेट आहेत. मात्र, अचानकपणे वाढणारी बाधित वाढ पाहता अद्याप काळजी घेण्याची गरज आहे. अल्पवाढीत देखील सातारा तालुका हॉटस्पॉट ठरलाय तर कराड तालुका पूर्णपणे सावरला आहे.
दरम्यान, रविवारी सायंकाळी 45 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. फक्त 6 नमुने तपासणीला पाठवण्यात आले असून गेल्या 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर रात्री उशिरा आलेल्या अहवालात 00 जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
सातारा शहर व तालुका हॉटस्पॉट
सातारा शहर व तालुका अल्प बाधित वाढीत देखील हॉटस्पॉट ठरला आहे. शनिवारच्या अहवालात सातारा शहरात 16 तर ग्रामीण भागात 17 असे 33 रुग्ण समोर आलेत. फलटण 17, कोरेगाव 16 सोडल्यास इतर सर्व तालुक्यात एक अंकी वाढ आहे. जावली तालुका निरंक राहिला असून कराडमध्ये फक्त 2 रुग्ण समोर आले असून कराड तालुक्यातील स्थिती चांगली सावरलीय व आटोक्यात आल्याचा दिलासा कराडकर अनुभवत आहेत. सातारकरांना मात्र काळजी घ्यावीच लागणार आहे.
जिल्हय़ात बिनधास्तपणा वाढलाय
कोरोना संसर्ग आटोक्यात आलाय. मात्र, संपलेला नाही. आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम सुरु असून बाधित मंदावल्याने जिल्हय़ात नागरिकांमध्ये बिनधास्तपणा आलाय. मास्क वापरताना तीव्र उन्हाची अडचण जाणवत असली तरी गर्दीमध्ये मास्क आवश्यक असून त्यानंतर हात स्वच्छ धुवणे, सॅनिटायझरचा वापर व सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा वापर काही महिने तरी करावाच लागणार आहे. नागरिकच नव्हे तर अगदी विद्यार्थी देखील विनामास्क वावरत असून सुरक्षित अंतराचा सर्वच फज्जा उडाल्याचे चित्र सध्या जिल्हय़ात आहे.
दोन बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालयामध्ये लिंब (ता. सातारा) येथील 50 वर्षीय पुरुष, व जिह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये देवडी (ता. माण) येथील 78 वर्षीय पुरुष अशा 2 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.