दक्षिणेतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील रॉकिंग स्टार अल्लू अर्जुन ‘पुष्पा’ चित्रपटाद्वारे पुन्हा एकत्र आले आहेत. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर निर्माते बनी वासू यांच्या ‘आयकॉन’ या चित्रपटासाठी देखील रश्मिकाला विचारणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम वेणू करणार आहेत. या चित्रपटात अल्लू अर्जुन हा पूजा हेगडे आणि रश्मिकासोबत दिसणार असल्याचे समजते.
रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. एकीकडे सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ चित्रपटात ती काम करत आहे. तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुडबाय’ चित्रपटामध्ये ती दिसून येणार आहे. रश्मिका ही दक्षिणेतील दिग्गज अभिनेत्री आहे. भारतात ती नॅशनल क्रश या नावाने प्रसिद्ध आहे.गीता गोविंदम आणि डियर कॉम्रेड हे तिचे चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले होते.