ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळी चकमक झाली. या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले असून, सध्या या भागात शोध मोहीम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवंतीपोरामधील नागबेरान त्राल या वनक्षेत्राच्या वरच्या भागात ही चकमक सुरू होती. प्रत्यक्षात काही दहशतवादी वनक्षेत्रात लपून बसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या तुकडीने या परिसराला वेढा घातला. दहशतवाद्यांनी स्वत:ला घेरलेले पाहून सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले. परंतु, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरूच ठेवला. सुरक्षा दलांनी या गोळीबाराला प्रत्युत्तर देत जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.