आषाढी एकादशीनिमित्त लोकमान्य सामाजिक-सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आयोजित लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र प्रस्तुत आषाढी एकादशीनिमित्त मंगळवार दि. 20 जुलै रोजी ‘अवघा रंग एक झाला’ या ऑनलाईन भक्तिगीत-अभंग गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वा. लोकमान्य सोसायटीचे युटय़ूब चॅनेल व फेसबुक पेज तसेच तरुण भारत न्यूज युटय़ूब चॅनेल व तरुण भारत न्यूज बेळगाव या फेसबुक पेजवरही हा कार्यक्रम ऑनलाईन पाहता येणार आहे.
या कार्यक्रमासाठी रसिकांनी 8080942671 या क्रमांकावर मिसकॉल केल्यास त्यांना लिंक मिळू शकणार आहे. दरवर्षी लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विठ्ठल भक्तांना अभंग व सुरेल भक्तिगीतांचा आस्वाद घेता येतो. परंतु यावर्षी कोरोनामुळे हा कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला आहे. भक्ती-संगीताची ही परंपरा सुरू राहावी, यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.
याची संकल्पना, लेखन प्रा. अनिल चौधरी यांचे आहे. संगीत दिग्दर्शन श्रीधर कुलकर्णी व संतोष गुरव यांनी केले आहे. यामध्ये श्रीधर कुलकर्णी, अर्चना बेळगुंदी, श्रीवत्स हुद्दार, काजल धामणेकर, अपेक्षा कडले, सोनाली पाटील, अनिस आणि रेहान मुल्ला हे कलाकार सहभागी होणार आहेत. संतोष गुरव, वैभव गाडगीळ, स्वाती हुद्दार व योगेश रामदास यांची साथसंगत मिळणार आहे.
कार्यक्रमाला बेळगाव मराठी भाषाप्रेमी मंडळ (सलग्न संस्था – बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली) यांचे सहकार्य मिळाले आहे. विठ्ठल भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमान्यतर्फे करण्यात आले आहे.