कॅम्प परिसरात तणावाचे वातावरण : अल्पवयीनसह दोघांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी /बेळगाव
अवघ्या साडेतीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना आठ दिवसांपूर्वी कॅम्प परिसरात घडली. मात्र आपली बदनामी होईल, या भीतीने सदर पीडित मुलीवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. मात्र तिची प्रकृती गंभीर बनल्याने तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर उघडकीस आलेल्या घटनेने कॅम्प परिसरात एकच खळबळ उडाली व संताप व्यक्त करण्यात आला. संतप्त नागरिकांनी संशयित आरोपींना चांगलाच चोप दिला. यामुळे कॅम्प परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. तातडीने अधिक पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला.
या प्रकरणातील संशयित आरोपी रोशन डेव्हीड डुपेज (वय 20, मूळचा रा. मुंबई) हा आपल्या नातेवाईकांकडे आला होता तर आणखी एक अल्पवयीन संशयिताने घरात कोणी नसल्याचे पाहून त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. सदर घटना तिच्या आईला समजली. त्यानंतर तिने त्या मुलीला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ही घटना कोणालाही बाहेर कळू नये म्हणून तिने गुप्तता बाळगली होती. मात्र त्या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.
आपली बदनामी होणार म्हणून संबंधित मुलीच्या आईने फिर्याद देण्यास नकार दिला. मात्र त्या मुलीचे नातेवाईक संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी संशयित आरोपींची चांगलीच धुलाई केली. याप्रकरणामध्ये एक तरुण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही जबर मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे खळबळ उडाली. त्यानंतर संशयित आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. संतप्त जमावाने कॅम्प पोलीस स्थानकासमोरही मोठी गर्दी केली होती. वातावरण तणावाचे बनत चालल्यामुळे कॅम्प परिसरात अधिक पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी आरोपींवर फिर्याद दिली. रोशन आणि त्या अल्पवयीन मुलावर कॅम्प पोलिसांनी पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला. कॅम्प पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सतीश धर्मट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. ही घटना समजताच तातडीने एसीपी चंद्राप्पा, पोलीस निरीक्षक धीरज शिंदे, पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, महिला पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक सुनीता पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जमावाला शांत केले.
कॅम्प परिसरातील दुकाने बंद
या घटनेनंतर कॅम्प परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस फौजफाटाही तैनात झाला. त्यानंतर या परिसरातील सर्वच दुकाने बंद करण्यात आली. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे पोलिसांनीही कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी तातडीने दुकाने बंद करण्यात आली.