वृद्धापकाळामध्ये शरीराची हालचाल मंदावते. तसेच शरीराचे अवयव अशक्मत झाल्याने पूर्वीप्रमाणे स्वबळावर हालचाल करू शकत नाही. अशा रुग्णांसाठी चंदीगड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी एक प्रभावी उपकरण आणि यंत्रणा निर्माण केली असून तिची किंमत अवघी 5 हजार रुपये आहे. या उपकरणामुळे संधीवात व इतर शारीरिक व्याधींनीग्रस्त असलेल्या व्यक्तींना हात-पाय इत्यादी महत्त्वाच्या अवयवांची हालचाल करणे सुलभ होते. या रुग्णांना भोजन करणे, पाण्याचा ग्लास स्वतःच्या हातांनी उचलून पाणी पिणे इत्यादी कामांमध्ये हे उपकरण मोलाचे साहाय्य करते. त्यामुळे या रुग्णांचे इतरांवरील परावलंबित्व कमी होते.
चंदीगढ विद्यापीठाचे विद्यार्थी विवेक चव्हाण, अमन गुप्ता, ललित यादव, मयांक वर्मा आणि इशान नायक हे या उपकरणाचे निर्माते आहेत. जराजर्जर रुग्णांची असाहाय्यता पाहून असे उपकरण निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली, असे ते विद्यार्थी सांगतात. हे उपकरण उपयोग करण्यास अत्यंत सोपे असून त्यासाठी मोठे तांत्रिक ज्ञान लागत नाही. अशिक्षित रुग्णसुद्धा त्याचा सहजगत्या उपयोग करू शकतात. शक्तीहीन झालेल्या हात-पाय इत्यादी अवयवांना आधार देऊन त्यांच्याकडून काम करून घेण्यास हे उपकरण उपयोगी ठरते. अशा परावलंबी रुग्णांबरोबर असणाऱया त्यांच्या नातेवाईकांनाही हे उपकरण साहाय्य करते.
हे उपकरण स्वयंचलित असून रुग्णाच्या आज्ञेनुसार त्याला आवश्यक असणाऱया वस्तू त्याच्यापर्यंत नेऊ पोहोचविते. तसेच रुग्णाच्या हाती पाणी किंवा आहार देण्याचे काम करते. त्याचप्रमाणे रुग्णाचा हात त्याच्या तोंडापर्यंत नेऊन त्याला पाणी पिणे किंवा आहार घेणे यासाठी साहाय्यही करते. अशातऱहेने रुग्णाच्या सेवेकऱयाची भूमिका हे उपकरण चांगल्या तऱहेने निभावू शकते. आता याचे पेटंट घेऊन त्याचे उत्पादन करण्याचा या विद्यार्थ्यांचा विचार आहे.