प्रतिनिधी / कोल्हापूर
मोटर वाहन कायदा १९८९ मध्ये सुधारणा करत ट्रेलर व बांधकामासाठी वापरण्यात येणार्या अवजड वाहनांची उंची ३.६ मीटर वरुन ४.७५ मीटर (१४ फूट) करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय परिवहन व दळणवळण मंत्री नितीन गडकरी घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरातील सर्व अवजड यंत्रसामुग्रीची वाहतूक करणारी वाहने या सुधारीत कायद्याच्या कक्षेत आली आहेत. त्यामुळे अवजड वाहन मालकांचा दंड भरण्याचा त्रास व वेळ दोंन्हींची बचत होणार आहे.
दरम्यान, या प्रश्नी कोल्हापूर अर्थमुव्हर्स असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी खासदार संजय मंडलिक यांना निवेदन देवून केंद्रीयस्तरावर पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. खासदार मंडलिक यांनीही पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून अर्थमुव्हर्स असोसिएशनने केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासह खासदार मंडलिक यांचेही विशेष आभार मानले आहे.
बांधकामासाठी उपयोगात आणले जाणार्या ट्रेलर व इतर अवजड वाहनातून नेण्यात येणार्या साहित्य, मालाला उंचीची मर्यादा ३.६ मीटर (११ फूट) होती. मात्र, इतर मालवाहतूक वाहनांपेक्षा उंचीला ही वाहने १ फूटापेक्षा जास्त असतात. त्यांची माणके आंतरराष्ट्रीय नियमानुसार ठरलेली असतात. अशा वाहनांमध्ये कोणतेही बदल करता येत नाहीत. त्यामुळे अशा वाहनातून अवजड यंत्रसामुग्री वाहतूक करताना गेल्या कित्येक दशकापासून कोटय़ावधी रुपयांचा दंड भरावा लागत होता. याशिवाय, हा दंड भरेपर्यंत वाहन थांबवून ठेवले जात होते.पर्यायाने वाहन, त्याचा चालक, त्यावरील यंत्र सामुग्रीचा मोठा खोळंबा होत होता. मोठा आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास वाहन मालकांना सहन करावा लागत होता.
खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी केंद्रीय परिवहन व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करुन व संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली व या मोटर वाहन कायद्यामध्ये तांत्रिक बदल करण्यासाठीची विनंती केली. सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मंत्री गडकरी यांनी वाहतूकदारांच्या हिताचा निर्णय घेत मोटर वाहन कायदा १९८९ मध्ये सुधारणा करत ट्रेलर व बांधकामासाठी वापरण्यात येणार्या वाहनांची उंची ३.६ मीटर वरुन ४.७५ मीटर (१४ फूट) केली. या निर्णयामुळे देशभरातील सर्व अवजड यंत्रसामुग्रीची वाहतूक करणारी वाहने या सुधारीत कायद्याच्या मर्यादेत आल्याने मोटर वाहन मालकांचा दंड भरण्याचा त्रास व वेळ दोंन्हींची बचत होणार आहे. त्यामुळे, देशभरातील वाहनधारकांमध्ये व अवजड यंत्रसामुग्री पुरविणारे ठेकेदारांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
अर्थमुव्हिंग असोसिएशनतर्फे खा. मंडलिकांचे आभार
दरम्यान, कोल्हापूर अर्थमुव्हींग असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी खासदार संजय मंडलिक यांची भेट घेवून त्यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल व त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करुन आभार मानले. यावेळी अर्थमुव्हींग असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील – सडोलीकर, सचिव अभय देशपांडे, प्रताप कोंडेकर, श्रीकांत घाडगे, सेवानिवृत्त प्रादेशिक सहाय्यक परिवहन अधिकारी रविंद्र भागवत, पै. राजाराम मगदूम, महेश धनवडे, संजय कसबेकर, संजय नाळे, अमोल पाटील, श्रीकांत घाडगे, संजय शंकरराव पाटील-शिरोलीकर, दीपक नलवडे, रंगराव आर. पाटील, अभय देशपांडे, रविंद्र साळुंखे, ऍड. सुरेश कुराडे, विज्ञान मुंडे, नितीन पाटील, आदी उपस्थित होते.