समादेवी गल्ली येथील पंतवाडय़ाच्यावतीने शुक्रवार दि. 19 रोजी पंत जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त हा लिहिलेला
विशेष लेख…
अवधूत सांप्रदाय हा दत्त सांप्रदायातील विविध सांप्रदायांपैकी एक आहे. अशा परंपरेत श्री पंतमहाराज बाळेकुंद्री या दत्तावतारी सत्पुरुषाची गणना असून त्यांनी या अवधूत पंथाची ध्वजा फडकवत ठेवण्याचे कार्य प्रभावीपणे केले आहे. सद्गुरुंचे व्यावहारिक नाव दत्तात्रेय रामचंद्र कुलकर्णीं. त्यांचा जन्म 3 सप्टेंबर 1855 रोजी कृष्णजन्माष्टमीला बेळगाव जिल्हय़ातील दड्डी या गावी झाला.
1875 मध्ये गुरुद्वादशीदिवशी परमहंस सिद्ध पुरुष बालमुकुंद (बाळा कुलकर्णी) यांचा श्री पंतांना अनुग्रह झाला व त्यांनी अवधूत मार्ग पुढे चालविण्याची आज्ञा केली. 27 ऑक्टोबर 1892 रोजी सद्गुरु त्यांचे समकालीन स्वामी विवेकानंद यांना बेळगावला भेटले व दोघांनीही आध्यात्मिक चर्चा केली. मॅट्रिक्मयुलेशन व इंग्रजी पब्लिक सर्व्हिस कमिशन परीक्षा पास झाल्यानंतर उच्च पदावर नोकरी न करता पंतमहाराजांनी बेळगाव येथील ‘द लंडन मिशन स्कूल’ या शाळेत 22 वर्षे शिक्षकाची नोकरी केली. संध्याकाळी घरी आल्यावर ते नेहमीच अध्यात्म व विद्यादानाचे कार्य करत असत.
श्री पंत महाराजांचे गद्य व पद्य वाङ्मय विपुल आहे. सहज काव्यस्फूर्तीने त्यांचा काव्यसंग्रह श्री दत्तप्रेमलहरी (भजनगाथा) या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांचे काव्यज्ञानाने भारलेले असे. अशा या महापुरुषांनी 16 ऑक्टोबर 1905 रोजी बेळगाव मुक्कामी आपला देह ठेवला. तेथून त्यांचा देह मिरवणुकीने बेळगावजवळील बाळेकुंद्री या गावी नेऊन अग्निनारायणांस अर्पण केला. सद्गुरुंना देहाग्नी दिल्यापासून हा पवित्र अग्नी (धुनी) अहोरात्र चालू आहे. बाळेकुंद्री येथे श्री पंतांची समाधी व मंदिर आहे. या संस्थानाला श्री क्षेत्राचे स्वरुप प्राप्त झाले आहे. हे ठिकाण आता पंतबाळेकुंद्री म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण बेळगावपासून 15 किमी अंतरावर आहे. हे स्थान आम्रवृक्षांच्या गर्द छायेत अत्यंत रमणीय आहे. हे ठिकाण ‘श्री दत्त संस्थान पंतबाळेकुंद्री’ या नावाने अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.
पंतमहाराजांचा आदर्श समोर ठेऊन संस्थानांच्या आवारात ‘श्री गोपाळ पंत आदर्श विद्यामंदिर’ ही मराठी व कन्नड माध्यमातील शाळा उभारली आहे. संस्थांतर्फे दरवषी विविध कार्यक्रम साजरे होतात. त्यामध्ये वैशाख महिन्यात पंत महाराजांचा विवाह सोहळा व बोधसत्र, पोथी वाचन शिबिर चालते. श्रावण महिन्यात अष्टमीच्या दिवशी जिथे जिथे पंत मंदिरे आहेत तेथे श्री पंत जन्माष्टमी उत्सव साजरा केला जातो. संस्थानात आश्विन महिन्यात पंतांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवषी 3 दिवस उत्सव आचरला जातो. या उत्सवास सर्व ठिकाणाहून भाविक उपस्थित असतात.
– वर्षा पंतबाळेकुंद्री, (बेंगळूर)