वृत्तसंस्था/नवी दिल्ली
न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी वकील प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने 1 रुपयाचा दंड ठोठावला आहे. निर्णयानुसार 15 सप्टेंबरपर्यंत दंड न भरण्यास भूषण यांना 3 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो तसेच तीन वर्षांसाठी त्यांना वकिलीपासून निलंबितही केले जाऊ शकते. 63 वर्षीय भूषण यांनी यापूर्वी माफी मागण्यास नकार दिला होता.
25 ऑगस्ट रोजी न्यायाधीश अरुण मिश्रा, बी.आर. गवई आणि कृष्णमुरारी यांनी भूषण यांच्या शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाचा निर्णय मान्य असला तरीही याच्या विरोधात कायदेशीर लढाई लढणार आहे. एक रुपयाचा दंड भरणार असलो तरीही निर्णयाच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या अधिकाराचाही वापर करणार असल्याचे भूषण यांनी म्हटले आहे.
मी जे बोललो ते प्रत्येक नागरिकाचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य असल्याचे मला वाटते. चुकीचे घडत असल्यास त्याच्या विरोधात आवाज उठविणे प्रत्येक नागरिकाचे सर्वात मोठे कर्तव्य आहे. दंड भरणार असलो तरीही निर्णयाच्या विरोधात दाद मागण्याचा अधिकार मी वापरणार आहे. अवमानप्रकरणाचा निर्णय आणि शिक्षेविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचे भूषण म्हणाले.