मेंदू निष्क्रिय झाल्याने हृदय, डोळे, मूत्रपिंडांचे दान
प्रतिनिधी /बेळगाव
अपघातात गंभीर जखमी झाल्याने मेंदू निष्क्रिय झालेल्या एका महिलेच्या अवयवदानामुळे तिघा जणांना जीवदान मिळाले आहे. हृदय, डोळे, मूत्रपिंड दान करण्यात आले असून या अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपणही करण्यात आले आहे.
हुक्केरी येथील शोभा सिद्धाप्पा गजबर (वय 42) ही महिला हुक्केरी बसस्थानकाजवळ झालेल्या वाहन अपघातात गंभीर जखमी झाली होती. तिच्या डोक्मयाला जबर दुखापत झाली होती. तिला उपचारासाठी केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
मेंदू निष्क्रिय झाल्यामुळे तिचा जीवन-मरणाचा लढा सुरू होता. यावेळी डॉक्टरांनी कुटुंबीयांना अवयवदानाचा सल्ला दिला. तो त्यांनी मान्य केला. या महिलेचा पती, मुले, भाऊ आदींना अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे अवयवदान करण्यात आले.
केएलई इस्पितळात दाखल झालेल्या 45 वषीय व्यक्तीला मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. दुसरे मूत्रपिंड धारवाड येथील एसडीएम इस्पितळाला पाठविण्यात आले. दोन अंधांना अवयवदानामुळे दृष्टीभाग्य लाभले आहे. केएलई इस्पितळात दाखल झालेल्या एका रुग्णावर हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. शोभा यांच्या कुटुंबीयांचे डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. एम. व्ही. जाली व वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. एम. दयानंद आदींनी आभार मानले.