नव्या संशोधनाचा निष्कर्ष : कमी उत्पन्न अन् कमी शिक्षितही जोखिममध्ये
विवाहित पुरुषाच्या तुलनेत अविवाहि पुरुषांमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडण्याचा धोका अधिक आहे. हा दावा स्वीडनमध्ये झालेल्या संशोधनात करण्यात आला आहे. कोरोनाच्या जोखिम क्षेत्रात आहे किंवा नाही हे दर्शविणारे अनेक घटक वैज्ञानिकांनी मांडले आहेत. वैज्ञानिकांनुसार तुम्ही पुरुष असाल, कनिष्ठ उत्पन्नवर्गातील, अविवाहित आणि अधिक शिक्षित नसल्यास कोरोनामुळे मृत्युमुखी पडण्याचा धोका अधिक आहे.
1. मृत्युमुखींमध्ये 20 हून अधिक वयाचे लोक
हे सर्व घटक कोरोनामुळे मृत्युमुखी पडण्याचा धोका वाढवतात असा दावा स्वीडनच्या स्टॉकहोम विद्यापीठातील संशोधक स्वेन ड्रेफाल यांनी केला आहे. हे संशोधन स्वीडनच्या नॅशनल बोर्ड ऑफ हेल्थच्या आकडेवारीच्या आधारावर करण्यात आले आहे. कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱयांमध्ये 20 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या पुरुषांचे प्रमाण अधिक होते असे आकडेवारीतून निदर्शनास येते.
2. पुरुषांमध्ये धोका अधिक
महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये कोरोनाचा धोका दुपटीपेक्षा अधिक आहे. परंतु विवाहित असल्यास धोका काहिसा कमी असल्याचे स्वीडनचे हे संशोधन सांगते. वैज्ञानिकांनुसार विवाह न झालेल्या महिला तसेच पुरुषांना दीडपट ते दुपटीपर्यंत अधिक धोका आहे. अविवाहित लोक अनेक प्रकारच्या आजारांना तोंड देत असतात, याचमुळे त्यांच्यातील मृत्यूदर अधिक असल्याचे अन्य एका संशोधनात म्हटले गेले होते.
3. स्वीडनमध्ये जन्मलेल्यांना अधिक धोका
विदेशाच्या तुलनेत स्वीडनमध्ये जन्मलेल्या लोकांना अधिक धोका आहे. कोरोनाच्या धोक्याचा संबंध लोकांचे अल्पशिक्षण आणि कमी उत्पन्नगटाशीही जोडलेले आहे. त्यांच्यातही मृत्यूचा धोका अधिक असल्याचे जर्नल नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रकाशित संशोधनात ड्रेफाल यांनी नमूद केले आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांचा मृत्यूदर अधिक असतो असा वैज्ञानिकांचा तर्क आहे. महिलांच्या शरीराचे स्वरुप आणि राहणीमान वेगळे असते. कमी शिक्षण आणि अल्प उत्पन्न असल्यास त्यांचे राहणीमान आणि आरोग्य अधिक बिघडते. ते स्वतःच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नसल्याने धोका वाढतो असा दावा संशोधकांनी केला आहे.