सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहरातील रविवार पेठेतील कासट मार्केट परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये अवैध दारु विक्री करणाऱ्या चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात पोलिसांनी 21 हजार 240 रुपये किंमतीच्या विदेशी दारुच्या 326 बाटल्या जप्त केल्या आहेत.
लॉकडाऊन असूनही कासट मार्केट परिसरात रात्रीच्या वेळी खुलेआम दारुचा काळाबाजार सुरू होता. पोलिसांनी दि. 24 रोजी या परिसरात छापा टाकला असता एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला विशाल रमेश बोबडे (वय 20, मूळ रा. कोपर्डे, ता. खंडाळा, सध्या रा. कासट मार्केट, रविवार पेठ, सातारा), अजय उर्फ पांडा चंद्रकांत घाडगे, जया उर्फ जयश्री सुरेश शिवगण, तानाजी बन्सी बडेकर (सर्व रा. 196, रविवार पेठ, सातारा) हे अवैधरित्या दारु विक्री करताना आढळून आले. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेवून त्यांच्याकडील 21 हजार 240 रुपये किंमतीच्या 326 विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.