पुलाची शिरोली / वार्ताहर
सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बेकायदेशिर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पुलाची शिरोली येथील माळवाडी भागातील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक केली आहे. विनायक सुकुमार कोळी वय वर्षे २४ रा. माळवाडी पुलाची शिरोली असे आरोपीचे नाव आहे. त्यांच्याकडून पिस्तूल व गोळ्या असा चाळीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गेल्या शुक्रवारी पुलाची येथील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार पिस्तूल प्रकरणी विनायक कोळी याचा शोध घेण्यासाठी सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे एक पथक पुलाची शिरोलीत आले होते. शिरोली औद्योगिक पोलीस ठाण्याचा पोलिसांच्या मदतीने याचा शोध घेवून ताब्यात घेतले. त्यानंतर अधिक तपासासाठी सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सांगलीला घेवून गेले होते.
गेम करण्यासाठी पिस्तुलची खरेदी ?
अवैधपणे पिस्तुल बाळगत असल्या प्रकरणी सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेले. कोळी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरोधी पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरुपाचे काही गुन्हे नोंद आहेत. तसेच त्याचा मोक्याच्या गुन्ह्यात कारागृहाची हवा खात असलेल्या गँगशी लागेबाधे आहेत का याची चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणाचा तरी गेम करण्यासाठी पिस्तुलची खरेदी केली आहे का ? या दिशेने तपास सुरु केला आहे, अशी माहिती सुत्राकडून समजते.
पिस्तुल तस्कराचा तपास सुरु
रेकॉर्डवरील गुन्हेगार कोळी यास पुरविण्यात आलेले बेकायदेशिर पिस्तुल कोणी दिले. त्या संबंधीत पिस्तुल तस्कराचा सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांच्याकडून तपास केला जात आहे, अशी माहिती पोलीस सुत्रानी दिली.