पॅरिस : पॅरिस सेंट जर्मेन फुटबॉल संघातील अव्वल फुटबॉलपटू नेमार याला कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त या क्लबच्या एका विश्वसनीय अधिकाऱयाने सांगितले. पॅरिस सेंट जर्मेन संघातील तीन अव्वल फुटबॉलपटूमध्ये नेमारचा समावेश आहे.
पॅरिस सेंट जर्मेन संघाने चॅम्पियन्स लीग स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले आहे. या क्लबमधील अन्य काही फुटबॉलपटूची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये तीन फुटबॉलपटूंना कोरोनाची बाधा झाली असल्याचे सांगण्यात आले. नजिकच्या काळामध्ये या क्लबच्या सर्व फुटबॉलपटूंची तसेच प्रशिक्षक वर्गाची कोरोना चाचणी घेतली जाणार आहे. चॅम्पियन्स लीग स्पर्धेत पॅरिस सेंट जर्मेन संघाला अंतिम सामन्यात बायर्न म्युनिच संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. प्रेंच लीग-1 फुटबॉल हंगामाला पुढील आठवडय़ापासून प्रारंभ होणार आहे. पण, सध्याची प्रतिकूल परिस्थिती पाहता ही स्पर्धा पुन्हा लांबणीवर टाकली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.