मधुकर झेंडे यांनी उलगडला ‘ऑपरेशन शोभराज’चा प्रवास
प्रतिनिधी /पणजी
असंख्य गंभीर गुह्यात गुंतलेला आणि खास करून अनेक महिलांच्या खुनामुळे ’सिरीयल किलर’ म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या चार्लस शोभराजच्या मुसक्या आवळण्यात अखेर मुंबईचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मधुकर झेंडे (जे साहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले) यांना यश आले होते. दि. 6 एप्रिल 1986 रोजी त्याला पर्वरी येथील ओ कोकेरो रेस्टॉरंटमधून अटक करण्यात आली होती.
या अटकेच्या एका महिन्यांपूर्वीच म्हणजेच मार्च 1986 मध्ये शोभराज कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या दिल्लीतील तिहार तुरुंगातून फरार झाला होता. तुरुंग संकुलात सुरू असलेल्या एका पार्टी दरम्यान त्याने तेथील सुरक्षारक्षकांना जेवणातून ड्रग्ज पाजले होते. तेथून तो थेट गोव्यात आला व वेगवेगळ्या ठिकाणी लपून फिरू लागला. त्याला आपल्या देशात अमेरिकेत पळून जायचे होते. त्याची पत्नी अमेरिकेत होती. तिच्याशी संपर्क साधून डुप्लकेट पासपोर्टच्या मदतीने तो गोव्यातून पळून जाणार होता.
त्याकाळी गोव्यातून थेट विदेशात फोनवरून बोलण्याची फारशी सुविधा नव्हती. एक तर पोस्टात जावे लागत होते किंवा एखाद्या खाजगी आस्थापनात जावे लागत होते. परंतु दोन्ही ठिकाणी जाणे धोक्याचे होते. अशावेळी पर्वरीत महामार्गावरच असलेल्या ओ कोकेरो रेस्टॉरंटमध्ये तशी सुविधा असल्याचे त्याला समजले होते. त्यामुळे त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तो पत्नीशी बोलत होते. नाही म्हटले तरी ते ठिकाण त्याला सुरक्षित वाटत होते, म्हणुनच अधुनमधून तो तेथे येत होता.
या दरम्यान, शोभराजच्या गोव्यातील हालचालींबद्दल मुंबई पोलिसांना सुगावा लागला होता. तत्पूर्वी महाराष्ट्रातील रेल्वे पोलिसांनी एका व्यक्तीला रिव्हॉल्व्हर आणि बॉम्बसह अटक केली होती. त्याच्या चौकशीदरम्यान तो शोभराजशी संबंधित असल्याचे समोर आले. त्याचवेळी एका वृत्तपत्राने इन्स्पेक्टर झेंडे हे शोभराजला ओळखत असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. यापूर्वी 1971 मध्ये झेंडे यांनी शोभराजच्या मुसक्या आवळल्या होत्या. सदर वृत्त वाचून तत्कालीन डीजीपी सूर्यकांत जोग यांनी झेंडे यांना बोलावले आणि ’ऑपरेशन शोभराजसाठी’ नियुक्त केले.
’आम्हाला आमचा पहिला सुगावा रेल्वेत अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीकडून मिळाला. त्यानंतर गोव्यात पोहोचल्यानंतर शोभराज वापरत असलेली मोटरसायकल शोधण्याची मोहीम आम्ही आरंभली. ती मोटारसायकल गोव्यात नोंदणीकृत होती. त्यामुळे जिथे जिथे ‘मोटारसायकल टॅक्सी’ स्टँड होते तिथे आम्ही चौकशी करत होतो. एके दिवशी एक स्थानिक व्यक्ती एका मोरपंखी हिरव्या रंगाच्या मोटरसायकलचे बारकाईने निरीक्षण करत होता. त्याच्याकडे चौकशी केली असता शोभराज ती दुचाकी वापरत असल्याचा आणखी एका सुगावा मिळाला. त्यानंतर आपण आयुक्तांशी संपर्क करून आणखी अधिकारी पाठवण्यास सांगितले. त्यानुसार आणखी पाच अधिकारी पाठविण्यात आले.
झेंडे यांच्या म्हणण्यानुसार, ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पणजी येथील सेंट्रल टेलिग्राम ऑफिस (सीटीओ) मध्ये जाऊन अमेरिकेत कोणी कॉल केले आहेत का ते तपासले. त्यावेळी एका कर्मचाऱयाने, विदेशी लोक सहसा सीटीओ वरून कॉल करत नाहीत. त्यासाठी ते खास करून पर्वरी येथील ओ कोकेरो रेस्टॉरंटमध्ये जातात, असे सांगितले. त्याने दिलेला हा सर्वात महत्त्वाचा क्ल्यू होता, असे झेंडे यांनी सांगितले. तोपर्यंत आमचे गोव्यात 5-6 दिवस वास्तव्य झाले होते.
दि. 6 एप्रिल 1986 रोजी सुदैवाने काही विदेशी लोक ओ कोकेरो रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करत होते. रात्रीची वेळ असूनही त्यांनी ’सन हॅट्स’ घातले होते. त्यामुळे आम्हाला शंका आली. आमचा संशय बळावला. त्यांच्यापैकी एक शोभराज असावा याची खात्री पटली. आम्ही सावध झालो. त्याच्याकडे पिस्तूलसारखी शस्रे असू शकतात याची खात्री होती. त्यामुळे कोणतीही घाई न करता त्याला त्याचे स्थान घेऊ दिले. आणि योग्य वेळ येताच त्याच्यावर झडप घातली.
शोभराजकडे शस्रे असू शकतात, असा जो अंदाज आम्ही बांधला होता तो सत्य ठरला. त्याला ताब्यात घेतले तेव्हा एक लोडेड पिस्तूल सापडले. त्यातून तो आमच्यावर गोळ्याही झाडणार होता, परंतु तत्पूर्वीच मुसक्या आवळल्यामुळे तो कोणतीही हालचाल करू शकला नाही. त्याशिवाय त्याच्याकडे बुटात लपवून ठेवलेले 10,000 डॉलरही सापडले. एवढी मोठी रक्कम त्याच्याकडे कुठून आली हे माहीत नसले तरीही भारतातील आपल्या मित्रांकडून त्याने ते मिळविलेले असावे, असा अंदाज आहे, गोव्यात एक बंगला भाडय़ाने घेऊन तो राहात होता, असे झेंडे यांनी सांगितले.
आश्चर्यकारक प्रकार म्हणजे या कारवाईसंबंधी गोव्यातील पोलिसांना मागमूसही लागू दिला नव्हता. म्हणुनच आम्ही त्यांची मदत न घेता स्वतंत्रपणे कारवाई केली. केवळ सुदैवानेच तो आम्हाला मिळाला होता, असे संबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना झेंडे म्हणाले.
त्यानंतर मुंबईत पोलीस आयुक्तांशी संकर्प केला. त्यांनी आम्हाला शोभराजसह त्वरित मुंबईत येण्यास सांगितले. ही एक अत्यंत प्रति÷sची अशी कारवाई होती. स्थानिक पोलिसांना का कळवले नाही, यावरून वाद झाला होता खरा. परंतु आरोपीला 24 तासांच्या आत कोर्टात हजर करत असाल तर स्थानिक पोलिसांना कळविण्याची आवश्यकता नसते, अशी तरतूद कायद्यात आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, तुरुंगातील कर्मचाऱयांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनाही शोभराज हवा होता. म्हणून त्याला ताब्यात घेण्यासाठी दिल्लीहून खास विमान पाठवण्यात आले होते. आम्ही मुंबईत येण्यापूर्वी पनवेलमधूनच त्याला उचलून दिल्लीत नेण्यात आले, असे झेंडे यांनी सांगितले.