इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांचे उद्गार : देशाच्या इतिहासातील सर्वात खराब वर्ष : जगभरात 5,04,952 बळी
जगभरात कोरोनाबाधितांचे प्रमाण आता 1 कोटी 02 लाख 72 हजार 028 झाले आहे. यातील 55 लाख 73 हजार 435 बाधितांना संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. तर 5 लाख 04 हजार 952 जणांचा बळी गेला आहे. महामारी आणि अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणच्या इतिहासातील हे सर्वात खराब वर्ष ठरले आहे. 140 वर्षांमध्ये इराणने अशाप्रकारची महामारी पाहिली नव्हती असे उद्गार राष्ट्रपती हसन रुहानी यांनी काढले आहेत. इराणमध्ये 2.20 लाखांपेक्षा अधिक बाधित असून 10 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार 24 तासांमध्ये 1 लाख 89 हजार 077 नवे रुग्ण सापडले असून 4,612 जणांचा मृत्यू झाला आहे.
कॅलिफोर्नियातील बार बंद
कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसॉम यांनी लॉस एंजिलिस समवेत 7 शहरांमधील सर्व बार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. एका महिन्यापूर्वीच प्रांतांमधील आर्थिक घडामोडी सुरू करण्यात आल्या होत्या. टेक्सास आणि फ्लोरिडातही बार तसेच रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहेत. लोकांनी विषाणूसंबंधी सतर्क राहणे गरजेचे आहे. हा संसर्ग अद्याप प्रांतात फैलावत आहे. काही भागांमध्ये रुग्ण वाढल्याचे न्यूसॉम यांनी म्हटले आहे.
अधिवेशनाला नकार
इराकच्या खासदारांनी कोरोना संकट पाहता संसदेच्या अधिवेशनात सामील होण्यास नकार दिला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संसदीय अधिवेशन आयोजित करण्याची शक्यता पडताळून पाहिली जात आहे. देशातील 30 पेक्षा अधिक खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. इराकमध्ये आतापर्यंत 45,402 बाधित सापडले असून 1,756 जणांचा मृत्यू झाला आहे.
ब्राझील : बळी वाढतेच
ब्राझीलमध्ये मागील 24 तासांमध्ये 552 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशातील बळींची एकूण संख्या 57,658 झाली आहे. याचबरोबर बरे झालेल्यांचे प्रमाण आता 7 लाख 33 हजारांपेक्षा अधिक झाले आहे. रुग्ण आणि बळींप्रकरणी ब्राझील अमेरिकेनंतर दुसऱया स्थानी आहे. ब्राझीलमध्ये संसर्गामुळे 12 रोजी पहिला मृत्यू ओढवला होता. देशातील रुग्णांचा आकडा आता 13 लाख 45 हजार 254 वर पोहोचला आहे.
द. कोरियात संसर्ग कायम
दक्षिण कोरियात दिवसभरात 42 नवे रुग्ण सापडले आहेत. याचबरोबर देशातील बाधितांचा एकूण आकडा 12,757 झाला आहे. तर दिवसभरात कोरोना संसर्गामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही. देशांतर्गत संसर्ग आणि विदेशातून येणाऱया रुग्णांमुळे आरोग्य अधिकाऱयांनी चिंता व्यक्त केली आहे. उन्हाळय़ात या महामारीची दुसरी लाट उद्भवू शकते अशी भीती अधिकाऱयांना सतावत आहे.
पाकिस्तानी वंशीय डॉक्टरवर कारवाई
ब्रिटनच्या जनरल मेडिकल कौन्सिलने पाकिस्तानी वंशीय डॉक्टर इक्बाल आदिल याचा वैद्यकीय सेवेचा परवाना निलंबित केला आहे. या डॉक्टरने महामारीसंबंधी चुकीची माहिती पसरविल्याचा आरोप आहे. कोरोना जगाला नियंत्रित करण्याचा कट असल्याचा दावा इक्बालने केला होता. ब्रिटनमध्ये आता कोरोनाबाधितांचे प्रमाण 3 लाख 11 हजार 151 झाले असून 43 हजार 550 जणांना जीव गमवावा लागला आहे.
संसर्ग शोधण्यासाठी लाळेची चाचणी
कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी ऑस्ट्रेलियात आता लाळेचे नमुने घेतले जात आहेत. जगात पहिल्यांदाच लाळेच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी केला आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी गळा किंवा नाकातील नमुन्यांची चाचणी केली जात होती. मेलबोर्नमध्ये दिवसभरात 49 नवे रुग्ण सापडले आहेत. तर देशाच्या अन्य भागांमध्ये केवळ 9 बाधित सापडले आहेत. व्हिक्टोरिया प्रांतात लाळेची चाचणी सुरू करण्यात आली असून याची अचूकता पडताळली जात आहे.
युएईने विमानसेवा रोखली
संयुक्त अरब अमिरातच्या जनरल सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने पाकिस्तानातून येणारी सर्व उड्डाणे स्थगित केली आहेत. युएईच्या मार्गावरील उड्डाणांच्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणीची व्यवस्था पाकिस्तान करेपर्यंत हा नियम लागू राहणार आहे. या निर्णयाचा फटका बसणाऱया प्रवाशांनी एअरलाइन्सला कळवून स्वतःच्या प्रवासाची तारीख बदलावी असे सुचविण्यात आले आहे.
बीजिंगमध्ये लॉकडाउन
बीजिंग आणि परिसरातील भागांमध्ये नवे रुग्ण सापडल्याने तेथे लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. सुमारे 4 लाख लोक आता स्थानबद्ध झाले आहेत. संसर्गाची स्थिती अद्यापही गंभीर असल्याचा इशारा प्रशासनाने लोकांना दिला आहे. बीजिंगपासून 150 किलोमीटर अंतरावरील अंशिन काउंटी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तेथे दिवसभरात 14 रुग्ण सापडले आहेत.