क्रीडा संकुल दोन वर्षांपासून वापराविना
प्रतिनिधी / बेळगाव
अशोकनगर येथे महापालिकेच्यावतीने क्रीडा संकुलाची उभारणी केली आहे. देखभाल करण्यासाठी कंत्राटदार मिळत नसल्याने क्रीडा संकुलाला टाळे ठोकून बंद ठेवण्यात आले आहे. देखभाल कंत्राटदार नियुक्तीसाठी मागविण्यात आलेल्या निविदा उघडण्याची मुदत संपली तरी कंत्राटदार नियुक्त केला नाही. त्यामुळे क्रीडा संकुल दोन वर्षांपासून वापराविना धूळ खात आहे.
मुख्यमंत्री शहर विकास अनुदानातून अशोकनगर येथील प्रशस्त जागेत महापालिकेने क्रीडा संकुलाची उभारणी केली आहे. अत्याधुनिक व्यायामशाळा, जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल, खुले मैदान आणि महिलांसाठी विशेष उद्यानाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आहे. सदर क्रीडा संकुलाची उभारणी करून दोन वर्षे होत आली, पण नागरिकांसाठी अद्याप खुले करण्यात आले नाही. कोटय़वधीचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेतील उपकरणे गंज खात आहेत. जलतरण तलावदेखील अद्याप वापराविना कोरडाच आहे. महिला उद्यान व मैदानात झाडे-झुडपे आणि गवत उगवल्याने सापकिडय़ांचे वास्तव्य वाढले आहे. सदर क्रीडा संकुल बंदच असल्याने नागरिकांना फिरण्यासाठी सोडण्यात येत नाही. त्यामुळे कोटय़वधी निधी खर्च करून उभारलेल्या क्रीडा संकुलाचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या संकुलाची देखभाल करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. कंत्राट पद्धतीने देखभाल करण्याची जबाबदारी सोपविल्यानंतरच क्रीडा संकुल खुले करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. याकरिता निविदा काढल्यानंतर प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे देखभाल कंत्राटदार नियुक्तीसाठी महापालिकेने डिसेंबरमध्ये दुसऱयांदा निविदा काढल्या. या निविदा प्रक्रियेवेळी काही कंत्राटदारांनी सहभाग घेतला. निविदा उघडण्याची तारीख उलटून गेली तरी अद्याप उघडण्यात आल्या नाहीत. कोरोनामुळे निविदादेखील उघडण्यात आल्या नाहीत. सदर निविदेची मुदत उलटल्याने निविदेच्या रकमेत फरक पडण्याची शक्मयता आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने काढण्याची शक्मयता आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबत लक्ष घालून क्रीडा संकुल खुले करावे, अशी मागणी होत आहे.