प्रतिनिधी / पणजी
शिर्डी श्रीसाईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर यांचे दि. 25 डिसेंबर रोजी दुपारी कोपरगाव येथे राहत्या घरी अल्प आजाराने निधन झाले.
संस्थानचे विश्वस्त असताना देशभरातील अनेक साईभक्तांशी त्यांचा जवळचा संबंध आला. त्यात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश होता. अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे ते ज्येष्ठ नेते होते तसेच कोपरगाव तालुक्यातील उत्तम पत्रकार म्हणूनही त्यांचा लौकीक होता. त्यातूनच गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी त्यांची खास जवळीक होती. जनसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेने ते सदैव कार्यरत राहिले.
त्यांच्या निधनाची बातमी ऐकून आपणास धक्का बसला अशी प्रतिक्रिया श्री. कामत यांनी व्यक्त केली आहे. आपला एक चांगला मित्र हरवला असे नमूद करताना त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे ट्वीट केले आहे.