वृत्तसंस्था/ मुंबई
बंगाल रणजी संघातील वेगवान गोलंदाज अशोक दिंडा आगामी राष्ट्रीय क्रिकेट हंगामामध्ये गोवा रणजी संघातून खेळणार आहे. गेल्या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये अशोक दिंडाला बंगालच्या रणजी संघातून डच्चू देण्यात आला होता.
बंगाल क्रिकेट संघटनेमध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याने दिंडाला रणजी संघातून वगळण्यात आले होते. आपल्याला राजकारणाचा बळी ठरविला, असे प्रतिपादन दिंडाने यापूर्वी केले होते. दरम्यान आपण यापुढे बंगाल संघाकडून खेळणार नसल्याची घोषणा दिंडाने गेल्यावर्षी केली होती. 2019-20 च्या क्रिकेट हंगामामध्ये बंगालचा संघ रणजी स्पर्धेतील उपविजेता ठरला आहे. 36 वर्षीय दिंडाने बंगाल क्रिकेट संघटनेतील ज्येष्ठ सदस्य बोस यांच्यावर जाहीर टीका केली होती. आगामी रणजी क्रिकेट मोसमामध्ये अशोक दिंडा गोवा रणजी संघाकडून खेळेल. या बातमीला गोवा क्रिकेट संघटनेचे सचिव विपुल फडके यांनी दुजोरा दिला आहे. दिंडाने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 420 प्रथमश्रेणी सामने खेळले असून त्याने 13 वनडे आणि 9 टी-20 सामन्यांत भारताचे प्रतिनिधीत्व करताना अनुक्रमे 12 आणि 17 बळी मिळविले आहेत. यापूर्वी त्याने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता.