500 कोटींची करणार गुंतवणूक : व्यावसायिक वाहनांची निर्मिती
वृतसंस्था/ नवी दिल्ली
हिंदुजा ग्रुपअंतर्गत येणाऱया अशोक लेलँड कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकरीता स्वतंत्र कारखाना उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाच्या मते, याकरीता 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून व्यावसायिक वाहनांची निर्मिती याठिकाणी केली जाणार आहे.
बदलत्या गरजांची दखल
सीएनजी, हैड्रोजन आणि इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती स्वतंत्र कारखान्यामध्ये केली जाणार आहे. कंपनीने या आधीच इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकरीता इंग्लंडमधील स्वीच मोबिलिटीसोबत 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केलेली आहे. बाजारातील बदलत्या गरजांची दखल घेऊन कंपनी विकसित इंजिनची सोय नव्या इलेक्ट्रिक वाहनामध्ये करणार आहे.
स्पेनमध्ये कारखाना
हे करताना आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचाही अंदाज घेतला जाणार असून स्पेनमध्ये निर्मिती कारखाना आणि संशोधन विकास केंद्र स्थापण्याचाही विचार कंपनीने केला आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून नव्या संधी आणि नव्या पर्यायांचा शोध येत्या काळात घेतला जाणार आहे. पुढील दोन वर्षामध्ये उत्पादन क्षमता वाढवली जाणार आहे.