कार्बन उत्सर्जनासह इंधन कपात करण्यावर भर
मुंबई
व्यावसायिक वाहनांची निर्मिती करणारी दिग्गज कंपनी अशोक लेलँडला बेंगळूर महानगर परिवहन निगमला (बीएमटीसी) जवळपास 300 इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करण्याचे कंत्राट नुकतेच मिळाले आहे.
सदरच्या बस दिल्यानंतर त्यांची देखभाल करण्याचे काम हे येत्या 12 वर्षांपर्यंत स्विच मोबिलिटीकडे राहणार आहे. यासह कंपनीने दिलेल्या माहितीनुसार शुद्ध शून्य उत्सर्जन असणाऱया व्यावसायिक वाहनांपैकी जगातील अग्रणी कंपनी बनण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समजते. बेंगळूर शहराला परिवहनाकरीता इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाल्याचा रास्त अभिमान असून ही सर्व वाहने ही शून्य उत्सर्जन मानक राहणार असल्याचे स्विच मोबिलिटचे उपाध्यक्ष एंडी पामर यांनी म्हटले आहे.या बसना बीएमटीसीमध्ये सामील केले जाणार असून वर्षाला 55 लाख लिटर इंधनाची बचत होणार आहे. यासोबतच कार्बनचे उत्सर्जन 14,500 टन प्रतिवर्ष कमी येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
अशोक लेलँडचे निधी उभारण्यासाठी प्रयत्न
हिंदुजा ग्रुपची अशोक लेलँड कंपनी सध्या निधी उभारण्यासाठी प्रयत्न करत आहे. याकरीता धोरणात्मक व आर्थिक गुंतवणूकदारांचा शोध कंपनी घेत असल्याचे समजते. सदरची गुंतवणूक ही इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. चेन्नईतील अशोक लेलँडच्या कारखान्यात ट्रक व बसची निर्मिती केली जाते. नव्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी, विकासासाठी तसेच तंत्रज्ञानाच्या अवलंबाकरिता ही गुंतवणूक वापरली जाणार आहे.