काणकोण पोलीस निरीक्षकासह दोन कॉन्स्टेबल निलंबित
प्रतिनिधी/ काणकोण
मॉडेल पूनम पांडेने काणकोणातील जलस्त्रोत खात्याच्या मालकीच्या चापोली धरणावर दिवसाढवळय़ा अश्लिल व्हिडिओ चित्रीत करून तो समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याच्या प्रकरणात साहाय्य केल्याचा संशय असलेले काणकोणचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे. मॉडेल पांडे हिलाही अटक करण्यात करण्यात आली आहे. तेहरान डिसोझा यांची काणकोणच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याच नेतृत्वासाखाली संपूर्ण प्रकरणाचा तपास होणार असे पोलीस उपअधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी उपसभापती इजिदोर फर्नांडिस, माजी मंत्री रमेश तवडकर, काणकोणचे उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू, मामलेदार विमोद दलाल उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फोनवरून पाठविलेला निरीक्षकाच्या निलंबनाचा आदेश उपसभापती फर्नांडिस यांनी आंदोलकांना ऐकायला दिला आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे काणकोणच्या जागरूक नागरिकांनी टाळय़ांच्या गजरात स्वागत केले.
पोलिसांसह जलस्रोत अधिकारीही निलंबित
या प्रकरणात गुंतल्याचा संशय असलेले काणकोण पोलीस स्थानकावरील दोन कॉन्स्टेबल, काणकोणातील जलस्त्रोत खात्याचे अधिकारी यांची चौकशी करतानाच हे प्रकरण लांबणीवर न टाकता शक्यतो लवकर काणकोणवासियांना न्याय मिळवून द्यावा, अशी जोरदार मागणी जागरूक काणकोणकर संघटनेच्या वतीने सम्राट भगत, सिद्धार्थ देसाई, रमाकांत ना. गावकर, शांताजी गावकर, गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक, मोहनदास लोलयेकर, आम आदमी पक्षाचे संदेश तेलेकर, गोंयकार संघटनेचे जॅक फर्नांडिस, काँग्रेसचे जनार्दन भंडारी, प्रलय भगत, महादेव देसाई, भाजपाचे नंदीप भगत, दामोदर च्यारी, नगरसेवक श्यामसुंदर देसाई, गुरू कोमरपंत, हेमंत ना. गावकर, भूषण प्रभुगावकर, सामाजिक कार्यकर्ते शिरीष पै, बबेश बोरकर, संजय कोमरपंत यांनी केली.
चापोली धरणावर कडक सुरक्षेची मागणी
यापुढे चापोली धरणाजवळ कडक सुरक्षा ठेवण्याची जोरदार मागणी उपस्थित वरील सर्वांनी केली. संपूर्ण तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची सोय ज्या ठिकाणाहून केली जाते त्या धरणावर आगंतुक व्यक्तींना यापुढे प्रवेश देऊ नये. ज्या व्यक्ती या प्रकरणात गुंतल्या आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे अभिनंदन : तवडकर
काणकोणच्या अस्मितेवर ज्या वेळी घाला पडतो त्यावेळी सर्व काणकोणसीय पक्षीय मतभेद विसरून संघटित होत असतात. अशा वेळी दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकांनी जे वर्तन केले ते आक्षेपार्ह असेच होते. आपण मुख्यमंत्री सावंत यांच्याशी याबाबतीत प्रत्यक्ष बोललो आहे, असे तवडकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका दाखविली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतानाच काणकोणवासियांनी ही जी एकजूट दाखविली आहे ती अशीच कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. शांततेने आंदोलन केल्याबद्दल सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.
चावडीवरील दुकाने स्वेच्छेने बंद
ज्या व्यक्तींच्या सहकार्याने हे दुष्कृत्य झालेले आहे त्यांना सजा होण्याची मागणी करत काणकोणच्या जागरूक नागरिकांनी केलेल्या बंदच्या आवाहनास व्यापाऱयांनी जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे सम्राट भगत यांनी जाहीर अभिनंदन करतानाच त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. उपसभापती फर्नांडिस यांनी मुख्यमंत्री सावंत यांचा आदेश फोनवरून ऐकविल्यानंतर भगत, संदेश तेलेकर यांनी व्यापाऱयांना फोन कॉल करून दुकाने सुरू करण्याचे आवाहन केले. जागरूक नागरिकांनी काणकोण बंदची हाक दिल्यानंतर गुरुवारी वडामळ, शेळेर, चार रस्ता येथे त्याचप्रमाणे रस्त्याच्या बाजूला बसून जी मासेविक्री व्हायची ती बंद राहिली. चावडीवरील मासळी मार्केट देखील अंशतः बंदच होते.
सरकारकडून गंभीर दखल : फर्नांडिस
पूनम पांडे हिच्या अश्लिल व्हिडीओ प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतलेली असून आपण मुख्यमंत्र्याना सविस्तर अहवाल दिलेला आहे. स्वतः मुख्यमंत्री याबाबतीत अस्वस्थ झालेले आहेत. जलस्त्रोत खात्याचे मंत्रीr फिलीप नेरी रॉड्रिग्स यांच्याशी आपण चर्चा केलेली असून यापुढे काणकोणवासियांची जीवनवाहिनी असलेल्या चापोली धरणाजवळ कडक सुरक्षा ठेवली जाईल आणि यासाठी आपण जातीने लक्ष देईन, असे उपसभापती फर्नांडिस यांनी यावेळी स्पष्ट केले. धरणावर जाण्यासाठी फाटक जरी असले, तरी ते फाटक वाहनांसाठी आहे. मात्र कोणीही सर्वसामान्य व्यक्ती आत येऊ-जाऊ शकते. यापुढे या गोष्टी घडणार नाहीत. या प्रकरणात ज्या ज्या व्यक्ती सामिल आहेत त्यांना सजा ही व्हायलाच हवी, असे ते म्हणाले.
त्याचबरोबर कोविड-19 च्या महामारीमुळे मागच्या आठ महिन्यांपासून काणकोणच्या व्यापाऱयांना खूप कठीण परिस्थितीचा सामाना करावा लागला आहे. लॉकडाऊनमुळे त्यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक झळ बसली. अशा वेळी बंदचे आवाहन करून व्यापाऱयांना वेठीस धरणे संयुक्तिक नसल्याचे आपण आवाहन केले होते, असे सांगून त्याचे पालन केल्याबद्दल फर्नांडिस यांनी जागरूक काणकोणकर त्याचप्रमाणे सर्व पक्षांचे अभिनंदन केले.
सुरक्षा रक्षक बळीचा बकरा ?
चापोली लघुधरणाचा परिसर अश्लिल व्हिडीओच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात आला त्यावेळी त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नव्हता हे आता उघड झाले आहे. काणकोण भाजप मंडळ समितीने जलस्त्रोत खात्याचे साहाय्यक अभियंता अल्लाबक्ष यांची भेट घेतली आणि यासंदर्भात खुलासा मागितला. या धरणावर असलेल्या सुरक्षा रक्षकांना बळीचा बकरा बनविले जाण्याचा संशय या भागातून व्यक्त होत आहे.
रिक्षा चालकाची जबानी घेणार
दरम्यान, ज्या दिवशी या व्हिडीओचे चित्रीकरण झाले त्यावेळी ज्या रिक्षाचालकाने पूनम पांडे आणि तिच्या पतीला धरणावर नेऊन सोडले होते त्या रिक्षाचालकाची जबानी घेतली जाईल, असे उपअधीक्षक आल्बुकर्क यांनी स्पष्ट केले आहे. त्याची जबानी खूप महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाचा पाठिंबा
ज्या ज्या वेळी काणकोणवासियांवर अन्याय झालेला आहे त्या त्या वेळी काँग्रेस पक्ष लोकांच्या बरोबर राहिलेला आहे आणि यापुढे देखील नेहमीच आपल्या पक्षाचे सहकार्य असेल, असे जनार्दन भंडारी, प्रलय भगत आणि महादेव देसाई यांनी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी स्पष्ट केले.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रशांत नाईक आणि मोहनदास लोलयेकर यांनीही या सकारात्मक लढय़ाबद्दल काणकोणवासियांचे अभिनंदन केले आहे. यापुढेही आपल्या पक्षाचे सहकार्य असेल, असे नाईक यांनी सांगितले. हा लढा काणकोणच्या अस्मितेचा त्याचप्रमाणे प्रतिष्ठेचा होता. काणकोणच्या जागरूक नागरिकांनी न्याय्य हक्कासाठी दिलेल्या लढय़ाच्या वेळी पोलीस अधीक्षक परमजित सिंग यांनी जी वागणूक दाखविली त्याचा यावेळी शांताजी गावकर, सिद्धार्थ देसाई आणि इतरांनी निषेध केला.