प्रतिनिधी/ बेळगाव
अल्पवयीन मुलीला अडवून तिच्याशी अश्लील बोलून तुला सोडणार नाही, जीवे मारू, अशी धमकी दिली. यामुळे तिने 15 झोपेच्या गोळय़ा खाल्ल्या होत्या. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने या तिघांना प्रत्येकी 3 वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी 14500 रुपये दंड अशी शिक्षा तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश मंजाप्पा हणमंताप्पा अनयण्णावर यांनी ठोठावला आहे.
तौसीफ इब्राहिम बेपारी (वय 24), महम्मदताहीर इब्राहीम बेपारी (वय 21, दोघेही रा. काकर स्ट्रीट, कॅम्प), जहीर शकीलअहम्मद शेख (वय 21, रा. मार्केट स्ट्रीट, कॅम्प) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनी 6 फेबुवारी 2016 रोजी अल्पवयीन मुलीला अडविले. त्यानंतर तिच्याशी अश्लील चाळे केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने झोपेच्या गोळय़ा खाल्ल्या.
कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस तपास अधिकारी एम. बी. कांबळे यांनी या प्रकरणी तिघांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता. तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले होते. या खटल्यात 10 कागदोपत्री पुरावे, दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये हे तिघेही दोषी आढळल्याने त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले. दंडामधील 40 हजार रुपये रक्कम अल्पवयीन मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत..