चांदीचा मुखवटा जप्त : तीन दिवसांतच पोलिसांनी लावला प्रकरणाचा छडा
प्रतिनिधी /बेळगाव
पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरात तीन दिवसांपूर्वी चोरीचा प्रकार घडला होता. मार्केट पोलिसांनी याप्रकरणी अंजनेयनगर येथील एका डॉक्टरला अटक केली असून त्याच्याजवळून मंदिरात चोरलेला अश्वत्थामाचा चांदीचा मुकुट जप्त केला आहे. चोरीच्या या घटनेनंतर केवळ तीन दिवसांतच पोलिसांनी याप्रकरणाचा छडा लावला आहे.
मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद, लक्ष्मण कडोलकर, एस. बी. खानापुरे, नवीनकुमार, एस. टी. तेली, विश्वनाथ माळगी, आशीर जमादार, खादरसाब खानम्मण्णावर, विनोद जगदाळे, शिवानंद चंडकी आदींनी ही कारवाई केली आहे.
याप्रकरणी रवी उर्फ रवीराज उमाकांत दंडावतीमठ (वय 37, रा. अंजनेयनगर) याला अटक करण्यात आली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
मंगळवार दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी अश्वत्थामा मंदिरात चोरी झाली होती. चांदीचा मुकुट चोरून पलायन करताना चोरटय़ाची छबी सीसीटीव्हीत कैद झाली होती. फुटेज व त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मार्केट पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून काढून त्याला अटक केली आहे. 1 लाख 30 हजार रुपये किमतीचा 2 किलो 190 ग्रॅम चांदीचा मुखवटा जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी ही माहिती दिली आहे.
वडिलांच्या खून प्रकरणीही झाली होती अटक
पोलिसांनी अटक केलेल्या रवी उर्फ रवीराज याला यापूर्वीही अटक झाली होती. 1 फेबुवारी 2018 रोजी रात्री पारीने हल्ला करून आपले वडील डॉ. उमाकांत शिवलिंगय्या दंडावतीमठ (वय 68, रा. अंजनेयनगर) यांचा खून केला होता. याप्रकरणी माळमारुती पोलिसांनी त्याला अटक केली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून तो जामिनावर आहे. उपलब्ध माहितीनुसार रवीची मनस्थिती ठिक नाही. एमबीबीएस नापास झाल्यानंतर रवीने शिक्षण अर्धवट सोडले होते.