मेलबर्न :
मंकडिग हा प्रकार क्रिकेटमधील खिलाडूवृत्तीला कलंक आहे. त्यामुळे ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला आयपीएल स्पर्धेदरम्यान मी मंकडिगची परवानगी अजिबात देणार नाही, असा फतवा दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने काढला आहे. आश्चर्य म्हणजे आपल्या पूर्ण कारकिर्दीत अखिलाडूवृत्तीचे अनेक दाखले देणाऱया पाँटिंगकडून असा फतवा काढला गेला आहे.
मागील वर्षातील आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक जोस बटलरला 69 धावांवर अश्विनने याप्रकारे धावचीत केले होते. त्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व करत असलेल्या अश्विनने चेंडू टाकण्यापूर्वी नॉन स्ट्रायकर एण्डवरील बटलर रेषेबाहेर गेल्याने बेल्स उडवल्या होत्या आणि त्यावरुन बराच वाद निर्माण झाला होता. अश्विन यंदा दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे.
1947 मध्ये माजी भारतीय फिरकीपटू विनू मंकडने ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राऊनला याच पद्धतीने बाद केले होते, तेव्हापासून या पद्धतीला ‘मंकडिग’ ना नावाने ओळखले जाते. ही पद्धत क्रिकेटच्या नियम बुकात नोंद आहे. पण, तरीही खिलाडूवृत्तीच्या विरोधात म्हणून या पद्धतीला ओळखले जाते.
‘मी अश्विनला ज्यावेळी भेटेन, त्यावेळी सर्वप्रथम याबद्दल ठणकावून सांगेन. माझी भाषा अर्थातच कठोर असेल. कारण, मंकडिग हा प्रकार खिलाडूवृत्तीच्या विरोधातील आहे. माझ्या मते अश्विनने देखील मागील अनुभवावरुन बोध घेतला असेल आणि कदाचित तो ही एव्हाना या पद्धतीने फलंदाजाला बाद करण्याच्या विरोधात असू शकेल’, असा दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगने नमूद केले. पाँटिंग येथे ‘द ग्रेड क्रिकेटर’ पॉडकास्टवर बोलत होता.
‘मागील हंगामात काय घडले, ते मी पाहिले आहे. त्यावेळी मी स्वतः पंचांशीही बोललो होतो आणि मंकडिगचा आधार घेऊ नये, असे त्यांचेही मत होते’, असे पाँटिंग मागील आयपीएलमधील त्या अनुभवाबद्दल बोलताना म्हणाला.
उभयतात जुगलबंदीची शक्यता
दस्तुरखुद्द अश्विनने मात्र त्यावेळी मंकडिग पद्धतीचा वापर केल्याचे त्यावेळी समर्थन केले होते. ही पद्धत खेळाच्या नियम बुकात आहे. त्यामुळे, त्याचा वापर करण्यास काहीच हरकत नाही, अशी पुष्टी त्याने जोडली होती. त्या धर्तीवर अश्विन व पाँटिंग यांच्यात यावरुन जुगलबंदी रंगली तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल, असे सध्याचे संकेत आहेत.
45 वर्षीय माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियातर्फे 1995 ते 2012 या कालावधीत 168 कसोटी सामने खेळले असून त्यात 13378 धावांचे योगदान दिले आहे. मंकडिगचा अपवाद वगळता मात्र त्याने अश्विनचे कौतुक केले.
‘अश्विन कुशल गोलंदाज आहे. त्याच्यासारखा खेळाडू संघात असावा, असे असे आमचे मागील वर्षापासूनच प्रयत्न होते. अश्विनने आयपीएलमध्येही सातत्याने उत्तम गोलंदाजी साकारली आहे. यंदा आमच्याही त्याच्याकडून बऱयाच अपेक्षा आहेत’, असे पाँटिंग शेवटी म्हणाला.