वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
येथे सुरू झालेल्या अखिल इंग्लंड खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत शुक्रवारी महिलांच्या दुहेरीत भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि एन.सिक्की रेड्डी यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले आहे. पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनचे आव्हानही उपांत्यपूर्व फेरीत संपले.
शुक्रवारी झालेल्या महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत हॉलंडच्या सेलेना पिक आणि चेरिल सिनेन या जोडीने भारताच्या अश्विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी यांचा केवळ 39 मिनिटांच्या कालावधीत 24-22, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. अश्विनी आणि सिक्की या जोडीने महिला दुहेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात बल्गेरियाच्या गॅब्रिएला स्टोएव्हा आणि स्टीफेनी स्टोएव्हा या भगिनींचा 31 मिनिटात 21-17, 21-10 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
पुरुष एकेरीत हॉलंडच्या मार्क कॅलेजोने भारताच्या लक्ष्य सेनचा उपांत्यपूर्व फेरीत 21-17, 16-21, 21-17 असा पराभव केला. पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रनकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे आव्हान दुसऱया फेरीतच समाप्त झाले. डेन्मार्कच्या किम ऍस्ट्रय़ूप आणि रासमुसेन या डेन्मार्कच्या जोडीने सात्विकसाईराज आणि चिराग यांचा 21-16, 11-21, 21-17 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. पुरुष एकेरीत भारताच्या समीर वर्माला दुसऱया फेरीत डेन्मार्कच्या अँटोनसेनकडून पराभव पत्करावा लागला. अँटोनसेनने हा सामना 22-20, 21-10 असा जिंकून तिसरी फेरी गाठली. मिश्र दुहेरीत भारताच्या धुव कपिला आणि मेघना जक्कमपुडी यांचे आक्हानही डेन्मार्कच्या नोहेर आणि मॅगेलँड यांच्याकडून 21-19, 21-8 असे संपुष्टात आले.