वृत्तसंस्था/ दुबई
इंग्लंडविरूद्ध नुकत्याच झालेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 24 गडी बाद करणारा भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनची फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम पुरूष क्रिकेटपटू म्हणून आयसीसीने निवड केली आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडची टॅमी ब्युमाँटची फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका रंगतदार झाली. इंग्लंडने चेन्नईत पहिल्या सामन्यात भारताचा दणदणीत पराभव करून मालिकेत आघाडी मिळविली पण भारताने चेन्नईत पुन्हा दुसरी कसोटी एकतर्फी जिंकून मागील पराभवाची परतफेड केली. त्यानंतर अहमदाबादमधील दोन्ही कसोटी भारताने केवळ तीन दिवसांत जिंकून इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आणले. या संपूर्ण कसोटी मालिकेत रविचंद्रन अश्विन, ऋषभ पंत, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची कामगिरी सर्वोत्तम ठरली. इंग्लंडच्या दारूण पराभवाला हे चारच खेळाडू पुरेसे ठरले.
या मालिकेत अश्विनने तीन सामने खेळले. दुसऱया कसोटीतील दुसऱया डावात अश्विनने दमदार शतक झळकविले. तसेच त्याने अहमदाबादच्या तिसऱया कसोटीत 400 बळींचा टप्पा गाठला. तसेच आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीपच्या अंतिम फेरीत नेले. आता साऊदम्प्टनच्या एजेस बाऊल मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जून महिन्यात अंतिम सामना खेळविला जाणार आहे. अश्विनने इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत तीन सामन्यात 24 बळी आणि 176 धावा जमविल्याने आयसीसीच्या फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंसाठी त्याची निर्विवाद निवड करण्यात आली. इंग्लंडचा कर्णधार रूटने या मालिकेत 3 सामन्यात 333 धावा आणि 6 गडी बाद केले. त्याचप्रमाणे विंडीजचा मेयर्स याने कसोटी पदार्पणात बांगलादेशविरूद्ध पहिल्या कसोटीत 210 धावा झळकविल्या होत्या. आयसीसीच्या फेब्रुवारी महिन्यातील सर्वोंत्तम पुरूष क्रिकेटपटूंच्या शर्यतीमध्ये अश्विन, रूट आणि मेयर्स यांच्यात चुरस निर्माण झाली होती पण अश्विनने आपल्या प्रतिस्पर्धांना मागे टाकले.
महिलांच्या विभागात इंग्लंडच्या टॅमी ब्युमाँटची फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. न्यूझीलंडबरोबर झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडच्या ब्युमाँटने एकूण 231 धावा जमविताना प्रत्येक सामन्यात अर्धशतक नोंदविले. अश्विनच्या कामगिरीचे विंडीजच्या इयान बिशपने कौतुक केले आहे.