प्रतिनिधी / ओटवणे:
असनिये येथील जंगलनजिक चरत असलेल्या गाभण म्हशीवर बुधवारी पट्टेरी वाघाने हल्ला करीत ठार केले व तिचा फडशा पाडला. बुधवारी रात्रीपासून या म्हशीची शोधाशोध केली असता गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
असनिये-गावठणवाडी येथील विश्वनाथ गोपाळ सावंत यांची गुरे बुधवारी जंगलाच्या नजिक सोलीयाचे भरड या ठिकाणी चरत होती. त्यातील गाभण म्हशीला या पट्टेरी वाघाने लक्ष्य करीत हल्ला केला आणि तिला ठार केले. त्यानंतर या म्हशीचा त्याने फडशा पाडला. बुधवारी सायंकाळी इतर गुरांसोबत ही म्हैस गोठय़ात न आल्यामुळे विश्वनाथ सावंत यांनी शोधाशोध केली असता त्यांना ही मृत म्हैस दिसली. पट्टेरी वाघाने या म्हशीचा निम्मा अधिक भाग खाऊन फस्त केला होता. हा प्रकार पाहून सावंत यांना धक्काच बसला. या घटनेत त्यांचे सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच बांदा वन परिमंडळाचे वनपाल अनिल मेस्त्राr, वनरक्षक गोजरे, वनमजूर आत्माराम सावंत आदींनी तात्काळ असनियेत जात म्हशीचे मालक सावंत यांची भेट घेतली तसेच घटनास्थळी जात पंचनामा केला.
दरम्यान, या म्हशीचा फडशा पाडलेला बिबटय़ा नसून तो पट्टेरी वाघच असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावच्या सीमेवर तसेच परिसरात अनेक वाहनचालकांसह ग्रामस्थांनी या पट्टेरी वाघाला पाहिले असून जंगलातील इतर वन्य प्राण्यांचाही त्याने फडशा पाडला आहे. यापूर्वीही या पट्टेरी वाघाने गुरांवर हल्ला करीत त्यांना ठार केलेले आहे.