प्रतिनिधी / असळज
असळज येथे बिबट्या सदृश्य प्राण्याने कुत्र्यावर हल्ला केल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. असळज येथील अनिल गंगाराम पाटील यांच्या घराबाहेर असणाऱ्या कुत्र्यावर रात्री ११.०० वाजता बिबट्याने झडप घातली. यावेळी अनिल पाटील यांना कुत्र्याच्या भुंकण्याचा जोरदार आवाज आल्याने त्यांनी आपल्या घराच्या खिडकीतून पाहिले असता त्यांना बिबट्या खिडकीतून दिसला व तो कुत्र्यावर हल्ला करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.
परंतु कुत्र्यावर झडप घातल्याने तो जखमी झाला. बिबट्या गावात आल्याची बातमी पसरताच नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हिंस्र जंगली प्राणी गावात शिरल्याने नागरिकामध्ये घाबरट पसरून परिसराभोवती घरे असणाऱ्या नागरिकामध्ये संध्याकाळी सन्नाटा दिसून येत आहे. शेतीच्या कामाच्या सुगीमध्ये हा प्राणी गावात आल्याने लोकामध्ये शेतीच्या कामाबाबत अडचण निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शेतीला राखणीला जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.|
शेतकऱ्यांनी घाबरू नये
बिबट्या सदृश्य प्राणी असळज येथे आल्याने नागरिकांनी भीतीने घाबरून जावू नये. जंगली प्राण्यांना डिवचू नये कारण ते अधिक हिंस्र होवू शकतात. याबाबत आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी काही अधिक माहिती किंवा प्राणी दिसल्यास वनविभागाशी तात्काळ संपर्क साधावा -आर.एम.मुल्ला वनरक्षक असळज –खोकुर्ले ता.गगनबावडा