5 जी सेवेसह फोन सादर ः झेनफोन 8 फ्लीपही लाँच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तैवानची कंपनी असुसने आपल्या नव्या बहुप्रतिक्षीत अशा दोन स्मार्टफोन्सचे जागतिक स्तरावर नुकतेच लाँचिंग केले असल्याचे समजते. भारतात सदरच्या स्मार्टफोन्सच्या सादरीकरणाला मात्र कोरोनामुळे उशीर होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तैवानच्या असुस कंपनीने झेनफोन 8 आणि झेनफोन 8 फ्लीप या दोन नव्या स्मार्टफोन्सचे सादरीकरण जागतिक स्तरावर नुकतेच केले आहे. स्नॅपड्रगन 888 चिपसेटसह 5 जी सेवेचा लाभ मिळवून देणारे हे फोन असणार आहेत. झेनफोन 8 ला 5.9 इंचाचा 1080 पी ओएलइडीचा डिस्प्ले असणार असून 16 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह सदरचा फोन येणार आहे. झेनफोन 8 ला 12 एमपी सोनी आयएमक्स 663 प्रंट कॅमेरा असणार आहे. हॉरीझन, सिल्वर आणि ऑब्सीडीयन ब्लॅक रंगात हे फोन येणार आहेत. झेनफोन 8 फ्लीप 8 जीबी रॅमसह 128 जीबी आणि 256 जीबी पर्यायासह येणार असून 6.67 इंचाचा अमोलेड डिस्प्ले याला असेल. याला 5 हजार एमएएचची बॅटरी असणार असून फास्ट चार्जिंगची सुविधा यात असेल.
भारतात होणार उशीर
सदरचे दोन्ही बहुप्रतिक्षीत स्मार्टफोन्स जागतिक पातळीवर उपलब्ध होणार असले तरी भारतात या फोनचे सादरीकरण होण्यास उशीर होणार आहे. त्यामुळे भारतीयांना या फोन्ससाठी आणखी काही कालावधी वाट पाहावी लागणार आहे. भारतात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सुरू असून ही परिस्थिती पाहून भारतातील लाँचिंग कंपनीने तुर्तास तरी लांबणीवर टाकले असल्याचे समजते.