फोंडा कदंब बसस्थानकाची दुरावस्था : दुरुस्तीकाम नाहीच, प्रवाशांना मात्र प्रवेश बंद : गोवा कॅनकडून सरकारला निवेदन
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा येथील कदंब बसस्थानकाच्या दुरुस्तीकामाची वर्क ऑर्डर निघण्यापूर्वीच चारही बाजूने पत्रे लावून निवारा शेडमध्ये प्रवाशांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बसच्या प्रतिक्षेत थांबणाऱया प्रवाशांवर भर उन्हात रस्त्यावर थांबण्याची नामुष्की ओढवली आहे. प्रत्यक्षात दुरुस्तीकामाला कधी सुरुवात होईल, याचा थांगपत्ता लागत नाही. मात्र मागील दिड महिन्यापासून निवारा शेडमध्ये प्रवेश बंद केलेला आहे. ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी एकंदरीत या बसस्थानकाची वाईट स्थिती आहे. गोवा कॅनने प्रवाशांच्या या गैरसोयीबद्दल वाहतूक संचालकांना निवेदन सादर करुन तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
फोंडा शहर राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने पणजी, मडगाव या मुख्य शहरांसह साखळी, डिचोली, सावर्डे, वाळपई, वास्को व अन्य भागात जाणाऱया प्रवासी बसेस फोंडा कदंब बसस्थानकावर थांबा घेतात. त्यामुळे प्रवाशांची याठिकाणी नियमित वर्दळ असते. विविध भागातून फर्मागुडी येथील महाविद्यालयांमध्ये शिकायला येणाऱया विद्यार्थ्यांचीही सकाळी व दुपारच्यावेळी गर्दी असते. बसचालक व वाहकही विश्रांतीसाठी या कदंब बसस्थानकावर थांबतात. बेळगाव, हुबळी तसेच पुणे, मुंबईकडे जाणाऱया कदंब बसेस व कर्नाटक राज्यातील बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी याठिकाणी थांबा घेतात. बसस्थानकाची निवारा शेड बंद केल्यापासून प्रवाशांना भर उन्हात उभे राहून बसची प्रतिक्षा करावी लागत आहे. फोंडय़ातील हे कदंब बसस्थानक सन् 1991 साली बांधण्यात आले होते. वेळोवेळी त्याची निगराणी न झाल्याने शेडचे छप्पर धोकादायक स्थितीत आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून स्लॅबचे तुकडे खाली पडू लागल्याने प्रवाशांना कायम धोका असतो. एक दोन वेळा स्लॅबचा काही भाग कोसळल्याने प्रवासी जखमी होण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले आहे. मात्र पावसाळा तोंडावर आला तरी, प्रत्यक्षात काम सुरु झालेले नाही. कामाची वर्क ऑर्डर निघण्यापूर्वीच मागील दिड महिन्यापासून चारही बाजूनी पत्रे लावून निवारा शेड बंद केली आहे. याठिकाणी बसच्या प्रतिक्षेत थांबणाऱया प्रवाशांना सध्या बसायला जागा नाही व उन्हापासून निवारा घेण्यासाठी पर्यायी शेडची सोय केलेली नाही. पावसाळा जवळ असल्याने बसस्थानकाच्या छप्पराचे काम तातडीने हाती घेऊन ते पूर्ण करावे, अशी मागणी गोवा कॅनतर्फे करण्यात आली आहे. हे काम रेंगाळत पडल्यास पावसाळय़ात प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत.
इमारतीची दुरावस्था व प्राथमिक सुविधांची वानवा
कदंब बसस्थानकाच्या इमारतीची तर सध्या दुरावस्थाच झालेली आहे. शिवाय प्रवाशांना लागणाऱया अनेक सुविधांची वानवा आहे. पिण्याचे पाणी व स्वच्छ सुलभ शौचालय नाही. तसेच रात्रीच्यावेळी वीज दिवे पेटत नसल्याने बहुतेकवेळा हा परिसर अंधारातच बुडालेला असतो. हे बसस्थानक शहरापासून काही अंतरावर असल्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने नेहमीच प्रश्न उपस्थित होत असतो. बंद असलेल्या काही बसेस याठिकाणी भंगारात पडून आहेत. ज्याची संबंधित खात्याकडून कुठली चौकशी केली जात नाही. बसस्थानकाकडे जाणाऱया रस्त्याचीही दुरावस्था झालेली आहे. गोवा कॅनचे समन्वयक रोलंड मार्टिन्स यांनी फोंडा कदंब बसस्थानकावरील या सर्व समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यासंबंधी लेखी निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्य सचिव, वाहतूक सचिव, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, वाहतूक पोलीस अधीक्षक, फोंडय़ाचे उपजिल्हाधिकारी व इतर संबंधीत अधिकाऱयांना सादर केल्या आहेत.