जीव्हीएम महाविद्यालयातर्फे क्रीडाविषयक राष्ट्रीय परिषद
क्रीडा प्रतिनिधी/ फोंडा
यशामागे न धावता असे कार्य करा की यश तुमच्या मागे धावत यायला पाहिजे. स्वत:मधील कमतरता बाजूला सारून आत्मविश्वास बाळगा. मिळालेल्या संधीचा फायदा उठवा. क्रीडा क्षेत्रात आपण उज्ज्वल भवितव्य घडवू शकता त्यासाठी निर्धार, चिकाटी व अथक मेहनत घेऊन आपले उद्दिष्ट गाठू शकता असे प्रतिपादन पद्मश्री तथा अर्जुन पुरस्कार विजेत्या डॉ. मलाथी होल्ला यांनी केले. फर्मागुडी फोंडा येथील जीव्हीएमच्या रायतूरकर महाविद्यालयाने ‘वंचित व उपेक्षित गटातील मुलांचे खेळाद्वारे जीवन परीवर्तन’ या विषयावर आधारीत आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
यावेळी प्रमुख पाहूण्या म्हणून पद्मश्री ऍड. नॉर्मा अल्वारीस, अर्जुन पुरस्कार विजेत्या रचना गोविल, जीव्हीएम कार्यकारीणी समितीचे अध्यक्ष भास्कर खांडेपारकर, प्राचार्य प्रविण भेंडे व महाविद्यालयाच्या शारिरीक शिक्षण संचालिका बॅटी डिसील्वा या उपस्थित होत्या. डॉ. मलाथी होल्ला या पॅरालिम्पीक खेळाडू असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी भारतातर्फे 428 पदके मिळवली आहे. 16 दत्तक मुलांचा त्या सांभाळ करीत आहे. लहानपणापासून त्या दिव्य़ांग असून त्यांच्यावर 34 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तरीही त्यांनी स्वत:च्या हिकमतीवर क्रीडा क्षेत्रात उच्च स्थान प्राप्त केले आहे. त्या पूढे म्हणाल्या आपल्यात असलेल्या कमीपणाबद्दल तक्रार करू नका. स्वत:ला स्वीकारून पुढील वाटचाल करा. मला चालता येत नव्हते तरीपण व्यायाम करायला शिकले, क्रीडा स्पर्धात भाग घ्यायला लागले, नंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके घेत राहिली. दिव्यांग असूनही मी खेळाचा आनंद घेत आहे. स्वत:ला बदला, स्वत:वर विश्वास ठेवा व भवितव्य घडवा. हे आयुष्य एकदाच मिळते, ते आनंदात जगा व दुसऱयांना मदत करा.
खेळ जीवनाचा अविभाज्य भाग -ऍड.नॉर्मा अल्वारीस
तत्पुर्वी ऍड. नॉर्मा अल्वारीस यांच्याहस्ते समई प्रज्ज्वलीत करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या खेळामुळे आपण सशक्त व सामर्थ्यवान बनतो. खेळ आपल्याला सांघिक भावना शिकवतो. शालेय स्तरावर खेळाचा अभ्यासक्रमात समावेश व्हायला हवा. आपण शालेय जीवनात कधी भाग घेतला नाही परंतू आता मी धावते, जीममध्ये जाते त्यामुळे व्यायाम हा एक अविभाज्य भाग झाला असे त्या पुढे म्हणाल्या.
त्यानंतर अर्जुन पुरस्कार विजेत्या रचना गोविल, एनईएसटीचे करण नांगिया, स्पोर्टस् कॉईलेशन ऑफ इंडियाचे जोसेफ निर्मल राज यांचे व्याख्यान झाले. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष कामगिरी केलेल्या महाविद्यालयातील माजी विद्यार्थी निलेश नाईक, लिझेट वाझ, संजय भंडारी, अनुजा मुधाळकर, टेरेंन्स डायस (सर्व क्रिकेट), जीवन बांदेकर (ज्युडो), दीपलक्ष्मी आवटी, निकिता गावडे (बेसबॉल), विश्वास प्रभूदेसाई (कबड्ढी), अनुष्का कुवेलकर (बॅडमिंटन), थाणू जल्मी (ऍथलेटीक), शौनक वेरेकर (धावक) व फॅमिला फर्नाडीस (स्क्वे मार्शल आर्ट) यांचा सन्मान करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य प्रविण भेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयान कुलासो व रूही खान यांनी केले. बॅटी डिसील्वा यांनी आभार मानले. आज शनिवारी दुपारी परिषदेचा समारोप होणार आहे.