5 लाखांहून अधिक रायफल्ससाठी रशियासोबत 5 हजार कोटींचा करार
अमेठी / वृत्तसंस्था
संरक्षण उत्पादनात देशाचा स्वावलंबीपणा आणखी वाढणार आहे. सरकारने 5 लाखांहून अधिक एके-203 असॉल्ट रायफल तयार करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. अ?Ÿसॉल्ट रायफलच्या निर्मितीसाठी रशियासोबत 5 हजार कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. हा प्रकल्प विविध एमएसएमई आणि इतर संरक्षण उद्योगांना कच्चा माल आणि घटकांच्या पुरवठय़ासाठी व्यावसायिक संधी प्रदान करेल, ज्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा दावा करण्यात आला आहे.
एके-203 हय़ा रशियन डिझाईनच्या रायफल्स अमेठीतील एका कारखान्यात बनवल्या जाणार आहेत. काही वर्षांपूर्वी दोन्ही देशांमध्ये हा करार झाला होता. भारतीय लष्कराला मिळणाऱया 5 लाख रायफल्सपैकी पहिल्या 70,000 रायफल्स रशियाकडून मिळतील. त्यानंतर तंत्रज्ञानाचे हस्तांतरण हळूहळू झाल्यानंतर त्याची भारतातच निर्मिती सुरू होईल. या रायफल्सची उत्पादन प्रक्रिया देशात सुरू झाल्यापासून 32 महिन्यांनंतर त्या सैन्याच्या हवाली केल्या जाऊ शकतात अशी माहिती देण्यात आली.
एके-203 असॉल्ट रायफल्स 300 मीटरपर्यंत प्रभावीपणे मारा करू शकतात. तसेच वजनाने हलक्या, मजबूत आणि तंतोतंत तंत्रज्ञानासह वापरण्यास अतिशय सुलभ असल्याचे सांगण्यात आले. या आधुनिक रायफल्समुळे सैनिकांची युद्धक्षमता वाढण्याबरोबरच दहशतवाद आणि उग्रवादविरोधी अभियानांमध्ये भारतीय सैन्याची क्षमता वाढण्याचा दावाही करण्यात आला आहे.