विराटसेनेसमोरही गुणतालिकेतील घसरण थांबवण्याचे लक्ष्य
अहमदाबाद / वृत्तसंस्था
यंदाच्या आयपीएल मोसमात अस्तित्वासाठी झगडत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर आज (सोमवार दि. 3) स्टार-स्टडेड खेळाडूंचा समावेश असलेल्या आरसीबीचे कडवे आव्हान असणार आहे. दुसरीकडे, दोन-एक पराभवामुळे गुणतालिकेत झालेली घसरण रोखण्यासाठी आरसीबीला आज नामी संधी असणार आहे. उभय संघातील या लढतीला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) संघ या मोसमात एकवेळ सलग 4 विजयांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान होता. पण, मागील 3 सामन्यात त्यांना 2 पराभव पत्करावे लागले असून सध्या ते गुणतालिकेत तिसऱया स्थानी घसरले आहेत. जलद गोलंदाज मोहम्मद सिराजने दिल्लीविरुद्ध रिषभ पंत, हेतमेयरसारखे तडाखेबंद फलंदाज क्रीझवर असताना शेवटच्या षटकात 14 धावांचे यशस्वी संरक्षण केले नसते तर आरसीबीला तिसरा सामनाही गमवावा लागला असता. ती नामुष्की त्यांना सिराजच्या काटेकोर गोलंदाजीमुळे टाळता आली आहे.
या सामन्यात विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर आणखी एकदा लक्ष केंद्रित असेल. शिवाय, युवा दर्जेदार सलामीवीर देवदत्त पडिक्कल देखील फटकेबाजी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असणार आहे. पडिक्कलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाबाद 101 धावा झळकावल्यानंतर पुन्हा आपला फॉर्म अधोरेखित केलेला नाही.
केकेआरची चिंता नेतृत्वापासून सुरु
दुसरीकडे, केकेआरचा संघ अनेक अडचणींशी झुंजत असून दस्तुरखुद्द कर्णधार इयॉन मॉर्गनच्या खराब फॉर्मपासूनच त्यांच्या समस्या सुरु होतात. या संघाला यंदाच्या मोसमात 7 पैकी 5 सामने गमवावे लागले असून सध्या ते गुणतालिकेत सहाव्या स्थानी फेकले गेले आहेत. एका अर्थाने प्ले-ऑफपूर्वी आव्हान संपुष्टात येण्याच्या दिशेनेच त्यांचा प्रवास सुरु आहे. शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी हे टॉप थ्री खराब फॉर्ममध्ये असल्याने याचा केकआरला मोठा फटका सोसावा लागत आहे. मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एकतर्फी पराभव पत्करावा लागला, त्यावेळी केकेआरने 6 बाद 154 अशी किरकोळ धावसंख्या उभारली आणि मुख्य प्रशिक्षक ब्रेन्डॉन मेकॉलम यांनी त्याबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली होती.
मागील आयपीएल मोसमात याच टप्प्यावर दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली या संघाने यापेक्षा सरस कामगिरी केली होती. त्यावेळी राजस्थानच्या खात्यावर 4 विजय व 3 पराभव नोंद झाले होते. पुढे दिनेश कार्तिककडून इंग्लिशमन इयॉन मॉर्गनकडे नेतृत्वाची सूत्रे बहाल केली गेली होती.
प्रतिस्पर्धी संघ
केकेआर ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुभमन गिल, नितीश राणा, टीम सेफर्ट, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्युसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, संदीप वॉरियर, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शकीब अल हसन, शेल्डॉन जॅक्सन, वैभव अरोरा, हरभजन सिंग, करुण नायर, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर, पवन नेगी.
आरसीबी ः विराट कोहली (कर्णधार), एबी डीव्हिलियर्स (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पवन देशपांडे, शाहबाज अहमद, एमएस वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, डॅनिएल सॅम्स, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, काईल जेमिसन, डॅन ख्रिस्तियन, सुयश प्रभुदेसाई, केएस भरत, फिन ऍलन.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 पासून.
केकेआरचा करुण नायर अद्याप पहिल्या संधीच्या प्रतीक्षेत
केकेआर संघाने नव्याने दाखल झालेला दिग्गज फलंदाज करुण नायर या मोसमात अद्याप पहिल्या संधीच्या प्रतीक्षेत आहे. करुण नायरचा स्ट्राईकरेट 155.49 इतका असून टी-20 सलामीवीर या नात्याने दोन तडाखेबंद शतके देखील झळकावली आहेत. या संघात पदार्पणाच्या प्रतीक्षेतील वेंकटेश अय्यरचा पर्याय देखील उपलब्ध आहे.