नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी राकेश अस्थाना यांची नियुक्ती केल्याने त्याला राजकीय विरोध होऊ लागला आहे. आपल्या पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी अस्थाना यांची दिल्ली पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. तसेच त्यांच्या नियुक्तीवरून केंद्र सरकावर टीका करत अस्थाना यांची नियुक्ती घटनाबाहय़ असल्याचा ठराव दिल्ली विधानसभेने नुकताच संमत केला आहे. दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा मुद्दा उपस्थित करत अस्थाना यांची नियुक्ती घटनाबाहय़ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरुद्ध असल्याचे नमूद करणारा ठराव ‘आप’चे आमदार संजय झा यांनी मांडला. गुजरात कॅडरच्या या वादग्रस्त अधिकाऱयाला पोलीस आयुक्त म्हणून दिल्लीवर थोपवण्यात आल्याबाबत या ठरावात नापसंती व्यक्त करण्यात आली आहे.