प्रा. आर. एम. करडीगुद्दी यांनी मांडले विचार : बुक लव्हर्स क्लबच्यावतीने लोकमान्य ग्रंथालयात कार्यक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
संत बसवेश्वर या क्रांतीकारी संताचे दीन-दलितांबद्दलचे कार्य, जगातील सारे लोक समान हा विचार 800 वर्षांपूर्वी मांडणारे व आचरणात आणणारे बसवेश्वर हे अस्पृश्यांच्या उद्धारासाठीच जन्मले असे विचार बसववचनाचे गाढे अभ्यासक प्रा. आर. एम. करडीगुद्दी यांनी मांडले.
बुक लव्हर्स क्लबच्यावतीने लोकमान्य ग्रंथालयात गुरूवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्ये. साहित्यिक दिवंगत डॉ. अनिल अवचट यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. व्यासपीठावर ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटे होते. किशोर काकडे यानी स्वागत, परिचय करून आभार मानले.
ते पुढे म्हणाले वडिल मादरस म्हणजे अधिपती अशा शैव ब्राम्हण जातीत जन्माला येवूनही ‘हाती असे झाडू, माथ्यावर टोपली या सेविकेचा दास असे मी’ किंवा ‘पलंग वाहून नेणाऱया दासीचा पुत्र असे मी’ अशा वचनांमधून बसवेश्वरांचे पददलितांविषयीचे प्रेम व कणव दिसून येते. मी अस्पृशांचाच असे ते म्हणत. बोले तैसा चाले असेच त्यांचे आचरण होते. राजाच्या दरबारी मुख्यमंत्री, कोषाधिकारी, दंडाधिकारी अशा पदांवर त्यांनी कार्य केले. कुडलसंगम- शरण-अनुभव मंटप – अल्लमप्रभुंचे योगदान – कायकवे कैलास व श्रमाला महत्व, आंतरजातीय विवाहाला मान्यता व बसवण्णांची राज्यातून हद्दपारी असा त्यांचा जीवनपट करडीगुद्दी यांनी मांडला.