लोकमान्य’-‘तरुण भारत’चा संयुक्त उपक्रम, महिलांसाठी विविध स्पर्धा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
‘तरुण भारत’चे अस्मिता व्यासपीठ व लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटीच्या ‘उन्नत्ती’ यांच्या संयुक्त विद्यमाने तिळगूळ समारंभ व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 25 जानेवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत माळनाका येथील शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. महिलांसाठी विविध खेळ, स्पर्धा व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजनही या निमित्ताने करण्यात आले आहे.
‘तरुण भारत’च्या ‘अस्मिता’ या महिलांच्या व्यासपिठामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप. सोसायटीमार्फतही समाजातील विविध घटकांसाठी उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन नेहमीच होते. पारदर्शकपणे कार्यरत असलेल्या या दोन्ही संस्थांमार्फत संयुक्तपणे या तिळगूळ समारंभ व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर येथे शनिवार 25 रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत हा कार्यकम होणार आहे. या मेळाव्यामध्ये महिलांसाठी ‘वन मिनिट गेम’ स्वरुपातील विविध स्पर्धा व मनोरंजनात्मक कार्यक्रमांसोबत बक्षीसे जिंकण्याची संधी आहे.
‘वन मिनिट गेम’ प्रकारात एका काडीत मेणबत्त्या पेटवणे, फुगे फुगवणे, कागदी कपांचे मनोरे तयार करणे, स्ट्राच्या सहाय्याने वाटाणे उचलणे, दोऱयामध्ये मणी ओवणे आदी फनी गेम्स होतील. याचवेळी महिलांना गंमतीदार उखाणे, नकला, गीतगायन आदी वैशिष्टय़पूर्ण सादरीकरणाचीही संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी केलेल्या स्पर्धकांना प्रथम प्राधान्य मिळेंल वेळ व नियोजनाच्यादृष्टीने शक्य झाल्यास आयत्यावेळीही काही स्पर्धकांना भाग घेता येईल.
महिलांना व्यक्त होण्याची संधी देणाऱया या महिला मेळाव्यामध्ये अधिकाधिक महिलांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी व विविध स्पर्धा आणि मनोरंजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘तरुण भारत’च्या ‘अस्मिता’ व लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटीच्या ‘उन्नत्ती’तर्फे करण्यात आले आहे.