ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
अहमदाबादमध्ये 2008 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषींना 13 वर्षांनंतर गुजरातमधील विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली. 38 दोषींना फाशीची तर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने मागील मंगळवारी या खटल्याची सुनावणी पूर्ण केली होती. त्यामध्ये 49 जणांना दोषी ठरवले होते आणि अन्य 28 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्यांच्या शिक्षेसाठी 18 फेब्रुवारीची तारीख निश्चित केली होती.
एकामागोमाग एक स्फोटांनी हादरले होते अहमदाबाद
26 जुलै 2008 रोजी 70 मिनिटांच्या कालावधीत झालेल्या 21 बॉम्बस्फोटांनी अहमदाबाद हादरले होते. या स्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला असून, 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीचा (गोध्रा घटनेचा) बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांनी हे हल्ले केले होते, ज्यात अल्पसंख्याक समाजातील अनेक लोक मारले गेले होते, असा दावा पोलिसांनी केला होता.
78 आरोपींसह खटल्याची सुरुवात
साखळी बॉम्बस्फोटानंतर काही दिवसांनी पोलिसांनी सुरतच्या विविध भागातून अनेक बॉम्ब जप्त केले होते. त्यानंतर अहमदाबादमध्ये 20 आणि सुरतमध्ये 15 एफआयआर दाखल झाले. न्यायालयाने सर्व 35 एफआयआर एकत्र केल्यानंतर डिसेंबर 2009 मध्ये 78 आरोपींविरूद्ध खटला सुरू झाला. यातील एक आरोपी नंतर सरकारी साक्षीदार झाला. या प्रकरणात नंतर आणखी चार आरोपींना अटकही करण्यात आली, मात्र त्यांची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने 1100 साक्षीदार तपासले.