गंभीर आजाराच्या कामात हलगर्जीपणा करणाऱया ‘सीएस’वर गुन्हा दाखल करा! : मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची पोलिसांकडे ई तक्रार
प्रतिनिधी / कणकवली:
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी आपल्या कामात हलगर्जीपणा करून जिल्हय़ातील सर्व लोकांच्या जीविताला धोका पोहोचविल्याप्रकरणी डॉ. चाकूरकर यांच्यावर 268, 269, 290, 336, 337 अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी ई तक्रार माजी आमदार, मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी वेंगुर्ले पोलीस निरीक्षक यांच्याकडे पाठविली आहे.
24 मार्चपासून संपूर्ण देशभरात कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. परंतु, शेतकरी, बागायतदार आपला शेतमाल विकण्यासाठी परवानगी घेऊन जिल्हय़ात, जिल्हय़ाबाहेर जात आहेत. त्याप्रमाणे वेंगुर्ले येथील एक 27 वर्षीय व्यक्ती योग्य ती परवानगी घेऊन आंबा वाहतुकीसाठी मुंबईत जाऊन आला. मुंबई रेडझोनमध्ये ते असल्याने 26 एप्रिल रोजी त्याच्या गावच्या सरपंचांमार्फत तो आल्याची बातमी पोलीस यंत्रणा व आरोग्य विभागाला कळविण्यात आली. त्यानुसार त्याच दिवशी तपासणी करणे आवश्यक होते. मात्र, 27 रोजी त्याला क्वारंटाईन करून ठेवण्यात आले. त्यानंतर पाच दिवसांनी 2 मे रोजी त्याला जिल्हा रुग्णालयात स्वॅब घेण्यासाठी दाखल करून घेण्यात आले. इतरांच्या स्वॅबसोबत त्याचाही स्वॅब मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला. मात्र, स्वॅबचा रिपोर्ट येण्यापूर्वी 5 मे रोजी सकाळी 9.30 वा. जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्याला डिस्चार्ज दिला. त्यानंतर ही व्यक्ती कुडाळ येथे अनेकांना भेटली. तसेच वायंगणी परिसरात अनेकांना भेटली. ही व्यक्ती समाजामध्ये फिरली, तर त्याच्या संपर्कात आलेल्यांना प्रादुर्भाव होऊ शकतो, याची पूर्वकल्पना असतानाही शल्य चिकित्सकांनी त्याला डिस्चार्ज दिला. ही चूक दुर्लक्षित करता येणार नाही. त्याचा कोविड 19 चा अहवाल 5 रोजीच सायंकाळी पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर आपली चूक लपविण्यासाठी त्याला घरी रुग्णवाहिका पाठवून आणण्यात आले.
जिल्हय़ातील अनेकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. यामुळे वेंगुर्ले तालुक्यातील नागरिकांमध्ये दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुका कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला. शल्य चिकित्सकांनी निष्काळजीपणा करणे, हलगर्जीपणा करणे हा त्यांच्या शासकीय कर्तव्याचा भाग नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी शासकीय किंवा आरोग्य विभागाच्या परवानगीची गरज नाही.
ही व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याचे माहिती असतानाही त्याच रुग्णवाहिकेतून कुडाळ व सावंतवाडी येथील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या सातजणांना आणण्यात आले. अशाप्रकारे जिल्हा शल्य चिकित्सक हे आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आपल्याला हव्या त्याप्रकारे रुग्णांच्या व सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत. सोशल डिस्टंन्सिंगच्या अनुषंगाने घ्यायची काळजी त्यांनी धाब्यावर बसविली आहे. शल्य चिकित्सकांवर साथीचा रोग कायदा 1897 तसेच भारतीय दंड संहिता कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी जिल्हा रुग्णालयाचे दप्तर व त्या-त्यावेळी उपस्थित डॉक्टर्स व परिचारिकांचे जबाबही नोंदविण्यात यावेत, असे या ई फिर्यादीत म्हटले आहे.