पवारांच्या हस्ते लोकार्पणास भाजपचा विरोध ; २७ रोजी मेंढपाळाच्या हस्ते लोकार्पण करणार
सांगली/प्रतिनिधी
विजयनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पणाचा वाद चिघळला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते स्मारकाच्या लोकार्पणास भाजपने विरोध केला आहे. येत्या रविवार २७ मार्च रोजी स्मारकाचे लोकार्पण करण्याचा निर्णय भाजप आमदार, पदाधिकारी व नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला. प्रसंगी सर्वसामान्य मेंढपाळाच्या हस्ते लोकार्पण करू, पण शरद पवार यांच्या हस्ते नको अशी आक्रमक भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे.
महापालिकेच्या वतीने विजयनगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी महापालिकेने या स्मारकाच्या कामासाठी खर्च केला आहे. येत्या २ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा निर्णय महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार, पदाधिकारी व नगरसेवकांची आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयात बैठक पार पडली.
आमदार गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, माजी महापौर तथा नगरसेविका संगीता खोत, मुन्ना कुरणे यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत सत्ताधारी राष्ट्रवादीने भाजपला विश्वासात न घेता परस्पर त्यांच्या नेत्यांच्या हस्ते स्मारक लोकार्पणाचा निर्णय घेतला आहे.
वास्तविक स्मारकासाठी महापालिकेत भाजप सत्ता काळात मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. स्मारकाच्या कामाला गती मिळाली होती. त्यामुळे लोकार्पण सोहळ्यास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना निमंत्रित करणे गरजेचे होते. मात्र राष्ट्रवादीकडून मनमानी कारभार असल्याचा आरोप करत शरद पवार यांच्याहस्ते स्मारक लोकार्पणास विरोध दर्शविला. राष्ट्रवादीच्या आधी येत्या रविवार २७ मार्च रोजीच सर्वसामान्य व्यक्तीच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला.