कोमल सावंतला संस्थेमार्फत १लाख ११हजाराची मदत
सांगली / प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याबरोबरच गरजू व गुणवंत विद्यार्थी व सेवक बांधवांना अडचणीच्या काळात संस्थेने अर्थिक मदत करण्यासाठी घेतलेली भूमिका कौतुकास्पद असून सर्वांसाठी दिशादर्शक असल्याचे मत तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री यांनी व्यक्त केले.
महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली मार्फत आयोजित केलेल्या कृतज्ञता निधी वितरण सोहळा समारंभात ते बोलत होते.यावेळी संस्थेचे चेअरमन आर.एस.चोपडे, मुंबई महानगरपालिकेचे माजी अभियंता शहाजीराव सवदे,व्हा.चेअरमन श्रीमती एल.टी.शेंडगे, सचिव एस.ए.पाटील, प्रशांत चौगुले, संस्थेचे सल्लागार ए.एम.वाघमोडे, एच.के.चव्हाण, खजिनदार संपतराव अनुसे, संस्था समन्वय समितीचे अध्यक्ष दिलीप वाघमोडे, कार्यवाह बा.पी.सरगर, प्रसिध्दी विभाग प्रमुख लुनेश विरकर, पदाधिकारी,सल्लागार, संचालक, मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंगेश मंत्री म्हणाले की, विश्व प्रार्थना खऱ्या अर्थाने जगण्याचे काम अहिल्या शिक्षण संस्थेत सुरू आहे. चंगळवादाच्या काळात समाजाला दिशा देण्याचे काम संस्थेने अविरतपणे सुरू असून संस्थेचे चेअरमन प्रा.चोपडे यांनी आपल्या वागण्यातून ‘आचार्य’पद मिळविले असल्याचे आवर्जून नमूद केले. पैसे हे सर्व काही नाही,पण हे समजण्यासाठी संस्काराची गरज आहे. संस्कार व विकृती या मधील फरक मंत्री यांनी मोजक्या शब्दात स्पष्ट केला. संकटांना न घाबरता त्यावर स्वार होवून बाहेर पडता येणे ही काळाची गरज बनली आहे.
संस्थेचे चेअरमन आर.एस.चोपडे म्हणाले की, ग्रामीण भागाला न्याय देण्यासाठी अहिल्या शिक्षण संस्था कटिबद्ध असून उपेक्षित विद्यार्थ्यांना स्वतः च्या पायावर उभे करण्यासाठी अहिल्या परिवारातील सर्व घटकांनी पुढे येणे आवश्यक असून अहिल्या शिक्षण संस्था नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या बाबतीत एक पाऊल पुढे राहील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी माजी अभियंता शहाजीराव सवदे म्हणाले की, कोणत्याही गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मी कधीही मागे हटणार नसल्याचे ठामपणे सांगितले.
यावेळी कोमल सांवतला अहिल्या शिक्षण संस्थे मार्फत १लाख ११हजार रुपयांची मदत करण्यात आली. या मध्ये प्रामुख्याने चेअरमन आर.एस.चोपडे, माजी अभियंता शहाजीराव सवदे यांनी प्रत्येकी १०हजार रूपयांची मदत केली. त्याच बरोबर म्हसवड येथील अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेनेही ५हजार रुपयांची मदत केली.
समारंभामध्ये संस्थेच्या कला महाविद्यालयातील गुणवंत व गरजू विद्यार्थिनी कु.कोमल सावंत ला ११ लाख ११हजार रू कृतज्ञता निधी देऊन संस्थेमार्फत सन्मानीत करण्यात आले.कोमल सावंत ने शिवाजी विद्यापीठात सलग तीन वर्षे पहिले येण्याचा बहुमान पटकाविला होता.तिने अधिकारी होण्याचे स्वप्न बोलून दाखविले. त्याचबरोबर शिक्षक आण्णासाहेब मोरे व श्रीमती संगिता कटरे यांनी ही अडचणीच्या काळात अहिल्या परिवारा मार्फत मिळालेल्या मदती मुळेच आज आम्ही तुमच्या समोर उभे असल्याचे सांगितले. कार्यक्रम संस्था कार्यालय, वसंत नगर, सांगली या ठिकाणी झाला. प्रास्ताविक दिलीप वाघमोडे यांनी तर सुत्रसंचालन प्रंशात स्वामी यांनी व आभार बी.पी.सरगर यांनी मानले.