प्रा. आशा मणगुतकर यांचे प्रतिपादन
सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
गोमंतकीय मराठी साहित्यिक, संशोधक व प्रकांड पंडित अ. का. प्रियोळकर यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. प्राचिन मराठी साहित्याचे संशोधन करताना त्यांनी तत्कालीन ख्रिस्ती साहित्यही प्रकाशात आणले. त्यांच्या या विपुल अशा संशोधन कार्याची परंपरा मात्र दुर्दैवाने पुढे जाऊ शकली नाही, असे प्रतिपादन केपे सरकारी महाविद्यालयाच्या माजी मराठी विभागप्रमुख प्रा. आशा मणगुतकर यांनी केले.
मराठी राजभाषा समिती, प्रतिभा प्रेन्ड्स सर्कल, बोरी आणि प्रागतिक विचारमंच, गोवा यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या अ. का. प्रियोळकर स्मृतीदिन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. फोंडा येथील विश्व हिंदू परिषद सभागृहात नुकताच हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर मराठी राजभाषा परिषदेचे अध्यक्ष गो. रा. ढवळीकर, डॉ. अशोक मणगुतकर, तरुण भारत गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर, माजी आमदार मोहन आमशेकर, गोमंतक साहित्य सेवक मंडळचे अध्यक्ष रमेश वंसकर, जयवंत आडपईकर हे उपस्थित होते.
अ. का. प्रियोळकर यांना 79 वर्षांचे आयुष्य लाभले. या अल्पकाळात त्यांनी तब्बल 59 ग्रंथ लिहिले. मराठी साहित्यात संशोधन क्षेत्राला त्यांनी विशेष उंची प्राप्त करुन दिली. दादोबा पांडुरंग तर्खडकर, भाऊ दाजी लाड या प्रतिभावंतांचे साहित्य प्रियोळकरांनी नव्याने वाचकांसमोर आणले. मुंबईत मराठी संशोधन मंडळाच्या स्थापनेमागे त्यांचे विशेष योगदान होते. या संस्थेचे ते नंतर संचालकही बनले. मराठी इतिहास व साहित्य संशोधनात एवढे सखोल कार्य करुनही सर्वसामान्य वाचकांपर्यंत प्रियोळकर पोचू शकले नाहीत, अशी खंतही आशा मणगुतकर यांनी व्यक्त केली.
प्रियोळकर हे बहुआयामी व्यक्तीमत्त्व होते. त्यांना पाच भाषा अवगत होत्या. मुळात त्यांना चित्रकार व्हायचे होते. पण ते संशोधन क्षेत्रात उतरले व मराठी साहित्यात अभ्यासाचा एक वस्तुपाठ त्यांनी निर्माण केला. त्यांच्या या अमुल्य कार्याबद्दल त्यांची मातृभूमी असलेल्या गोव्यात स्मारक व्हायला हवे होते, असेही त्यांनी नमूद केले. गो. रा. ढवळीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रमेश वंसकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला. दुर्गाकुमार नावती यांनी सूत्रसंचालन तर जयवंत आडपईकर यांनी आभार मानले.