सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
गोमंतक साहित्य सेवक मंडळ पणजी आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा 60 वा वर्धापनदिन शनिवार 15 व रविवार 16 रोजी नागेशी येथील श्री नागेश महारुद्र देवस्थानच्या सभागृहात साजरा करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष रमेश वंसकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
फोंडा येथील थ्रिफ्ट सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला साहित्य सेवक मंडळाचे कार्यवाह सुहास बेळेकर, कवी प्रकाश तळवडेकर व जयवंत आडपईकर हे उपस्थित होते. शनिवार 15 रोजी सायं. 5 ते 7 वा. यावेळेत सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी गोवा विद्यापीठाचे निवृत्त मराठी विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कोमरपंत यांचे बीज भाषण होईल. उदगिर महाराष्ट्र येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे हे खास निमंत्रित म्हणून उपस्थित असतील. उद्घाटन सोहळय़ानंतर सायं. 7.30 ते रात्री 9 वा. यावेळेत प्रा. सारीका आडविलकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कवी संमेलन होईल.
रविवार 16 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वा. यावेळेत ‘लिखित माध्यम’ या विषयावर चर्चा सत्र होणार असून त्यात श्रीराम पवार (कोल्हापूर) व आसराम लोमटे (औरंगाबाद) या वक्त्यांचा सहभाग असेल. राजू. भि. नाईक (गोवा) व श्रीधर लोणी (पुणे) हे चर्चक म्हणून उपस्थित राहतील. दुपारी 2 ते सायं. 5 वा. यावेळेत दृकश्राव्य माध्यम या विषयावर चर्चा सत्र होईल. त्यात नाटय़कर्मी देविदास आमोणकर (गोवा) व रविराज गंधे (मुंबई) या वक्त्यांचा सहभाग असेल, चर्चक म्हणून सरिता कौशिव (नागपूर) व तुषार बोडके (औरंगाबाद) यांचा समावेश असेल. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष उषा तांबे, कार्यवाह उज्ज्वला मेहंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागी तसेच कार्यकारिणीचे इतर सभासद कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रमेश वंसकर यांनी दिली.