क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
नावेलीतील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या अखिल भारतीय मास्टर्स रेंकींग बॅडमिंटन स्पर्धेत गोव्याच्या संध्या मेलाशिम्मीचे 35 वर्षांवरील गटात दुहेरी किताब मिळविण्याचे स्वप्न अखेर भंगले. तिने दुहेरीत सुवर्णपदक मिळविले, मात्र एकेरीत तिला अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
गोव्याच्या सी. के. अयुबने केरळच्या झेवियर राफायलच्या साथीने 50 वर्षांवरील दुहेरीत रौप्यपदक प्राप्त केले. गोव्याची माजी राज्य विजेती बॅडमिंटनपटू लीना पेडणेकरने 45 वर्षांवरील गटात दुहेरी किताब मिळविला. एकेरीत तिने सुवर्ण मिळविल्यानंतर दुहेरीत 40 वर्षांवरील गटात पुजा मेहताला साथील घेत सुवर्णपदक मिळविले.
गोवा बॅडमिंटन संघटनेने अखिल भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या अधिपत्याखाली आयोजित केलेल्या या स्पर्धेत 40 वर्षांवरील पुरूष दुहेरीत पी. राघवन व वरुण शर्मा, 45 वर्षांवरील महिला दुहेरीत एस. बानू व शालिनी शेट्टी, 40 वर्षांवरील पुरूष एकेरीत अभीन शाम गुप्ता, 45 वर्षांवरील मिश्र दुहेरीत के. ए. अनीश व विजय लॅन्सी तर 40 वर्षांवरील मिश्र दुहेरीत जे. बी. एस. विद्याधर व नुपूरा गाडगीळ जोडीने सुवर्णपदके मिळविली. 35 आणि 50 वर्षांवरील विभागात उपान्त्यपूर्व फेरी गाठलेल्या गोव्याच्या संदीप कांझी व कमलेश कांझी, विल्प्रेड जॅक्स, अमित कक्कर, विशाल वेर्णेकर, ऑस्कर सिल्वेरा आणि आंजेलो डायस यांनी स्पेनमधील बॅडमिंटन स्पर्धेत खेळण्याची पात्रता मिळविली आहे. बक्षीस वितरण सोहळय़ाला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, क्रीडा प्रोमोटर मनोज पाटील, भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या स्पर्धा समितीचे चेअरमन ओ. डी. शर्मा, बीएआयचे निरीक्षक राकेश शेखर, गोवा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर व सचिव संदीप हेबळे उपस्थित होते.