बंदी उठल्याने पुनरागमनासह नवीन इनिंगसाठी जोरदार तयारी
फिरोज मुलाणी / औंध
गेल्या चार वर्षाचा काळ हा माझ्यासाठी फारच अवघड आणि खूपच वेदनादायी होता. ऐन भरात असताना मला बंदीला सामोरे जावे लागले होते. मी दोषी नसल्याचे माझे मन मला सांगत होते. त्यामुळे मी निश्चितपणे यातून निर्दोषपणे बाहेर येईन असा आत्मविश्वास होता. माझ्यावर झालेला अन्याय कदाचित नियतीलाच मान्य नसावा .महामारीने आँलम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे गेली आहे. कोरोना जगासाठी संकट बनून आला असला तरी तो माझ्या करीता नवीन आशेचा किरण घेऊन आला आहे. परमेश्वरानेच मला आणखीन एक संधी उपलब्ध करून दिली आहे. पुन्हा नव्या जोमाने सराव करून पात्रता फेरीत क्वालीफाय होऊन देशाला आँलम्पिकचे पदक मिळवून देईन. नव्या इनिंगसाठी आता मी सज्ज झालो आहे असा विश्वास ट्रीपल महाराष्ट्र केसरी आणि जागतिक पदक विजेता मल्ल नरसिंग यादवने ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला आहे.
2016 च्या रिओ आँलम्पिक स्पर्धेत आखाडय़ात उतरण्यापूर्वी वाडाने घेतलेल्या डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने कपाळी चार वर्षाच्या बंदीचा शिक्का घेऊन हताशपणे नरसिंगला मायदेशी परतावे लागले होते. वास्तविक नरसिंगचा तो ऐन उमेदीचा काळ होता आणि तो अगदीच फार्मात होता. मात्र बंदीमुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे दरवाजे त्याच्यासाठी बंद झाल्याने त्याच्या कुस्ती करीयरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तत्पूर्वी जागतिक कुस्ती स्पर्धेत कास्यपदक मिळवून नरसिंगने 74 किलो वजनगटात आँलम्पिक करीता आपले स्थान निश्चित केले होते. मात्र स्पर्धेपूर्वी याच गटात आँलम्पिक पदक विजेता सुशिलकुमारने दावा सांगितल्यामुळे आखाडय़ात वादविवादाचा बराच धुरळा उडाला होता. तर अगदी न्यायालयात देखील सुशिलकुमारने याबाबत आव्हान देऊन नरसिंगचा रस्ता रोखण्यासाठी नवा डाव टाकला होता. परंतु न्यायालयीन लढाईतही नरसिंगने बाजी मारीत सुशिलवर मात केली होती. परंतु अचानक सोनिपत सराव शिबिरात त्याच्या आहारात उत्तेजक द्रव्य आढळल्याने घेण्यात आलेल्या डोपिंग चाचणीत तो दोषी आढळला होता. परंतु कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खा. ब्रिजभूषणसिंह यांनी आपली सर्व ताकद नरसिंगच्या मागे उभी करून त्याची चाचणी घेऊन क्लिनचीट देत त्याच्या साठी आँलम्पिकचा दरवाजा खुला करून दिला होता.
आँगस्ट 2020 ला टोकिओ आँलम्पिकचा बिगुल वाजण्याच्या अगोदरच कोरोनाच्या महामारीचे वैष्विक संकट उभे ठाकल्याने स्पर्धेचे सगळेच वेळापत्रक कोलमडले आणि तब्बल एक वर्षाकरीता आँलम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. स्पर्धा पुढे गेल्यामुळे नरसिंगच्या बंदीचा काळ देखील समाप्त झाला असून
यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुनरागमन करण्याची नवी संधी त्याला उपलब्ध झाली आहे. आता नव्याने आखाडय़ात उतरण्यासाठी त्याने दंड थोपटले आहेत. पूर्वीच्याच 74 किलो वजनगटातून तो आखाडय़ात पुनरागमन करणार आहे. संपूर्ण आयुष्य कुस्तीला वाहिलेल्या नरसिंगला डोपिंग मध्ये दोषी आढळल्याने घातलेल्या बंदी मुळे आँलम्पिकमध्ये पदक मिळवण्याची मोठी संधी हुकल्याची रुखरुख मनाला लागली होती. वास्तविक माझ्या विरुद्ध कटकारस्थान रचून मला डोपिंगमध्ये अडकवण्यात आले होते.मी काहीच चुकीचे केले नव्हते याबद्दल माझे मन मला सांगत होते. आणि यासंपूर्ण प्रकरणात मी निर्दोषपणे बाहेर पडेन याबद्दल मला विश्वास देखील होता. भगवान के घर देर है लेकिन अंधेर नही या उक्तीप्रमाणे परमेश्वरालाच माझ्यावर झालेला अन्याय मान्य नसावा त्यामुळेच कोरोनाच्या संकटामुळे मला मोका दिला आहे. आता मी पुन्हा नव्या दमाने सराव करून मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवणार आहे. असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. बंदीच्या काळात एकदिवसदेखील मी सरावापासून दूर राहिलो नाही. मला मँटवरील स्पर्धेत सहभागी होता येते नसल्याने मी मैदानी स्पर्धेत खेळत होतो. शिवाय माझे प्रशिक्षक जगमलसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय मल्ल संदीपकुमार, विवेक यादव यांच्याबरोबर लढतीचा सराव सुरू ठेवल्याचे त्याने सांगितले.
आयडाँल मानले त्यानेच रस्त्यात काटे पसरले.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मी परिश्रमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली होती. आँलम्पिक पदक विजेत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी वाटचाल करीत होतो. यश माझ्या नजरेच्या टप्प्यात असताना द्वेषापोटी माझ्या वाटेत काटे पेरून माझे जीवनच उध्वस्त करण्याचा तो डाव दुर्दैवी होता. त्यामुळे मला खूप वेदना सोसाव्या लागल्या. याकठीण काळात मी सराव सोडला नाही. माझे वरिष्ठ आणि कुटुंबातील सगळेजण पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने मी जिवंत राहिलो.
आँलम्पिक पदकासाठी सर्वस्व पणाला लावणार.
मी राष्ट्रीय स्पर्धेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रकूल, काँमनवेल्थ, एशियन चँम्पियनशिप, तसेच जागतिक कुस्ती स्पर्धेत देशाला पदके मिळवून दिली आहेत. आँलम्पिक वगळता आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व पदके माझ्याकडे आहेत. आँलम्पिक मध्ये पदक मिळवण्याचे माझे स्वप्न होते. मधल्या घटनेमुळे ती आशा धुसर झाली होती. आता पुन्हा मोका आला आहे. स्वप्न साकार करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून देशाला पदक मिळवून देऊन डोपिंगचा लागलेला कलंक पुसून काढणार आहे.