आंगणेवाडीत येणारे सर्व मार्ग बंद : असाल तेथूनच नमस्कार करा! – भाविकांना आवाहन
दत्तप्रसाद पेडणेकर / मसुरे:
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱया आंगणेवाडी येथील भराडी देवीचा वार्षिक यात्रोत्सव 6 मार्च रोजी साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने व केवळ आंगणे कुटुंबिय व आंगणेवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा यात्रोत्सव कोरोनाचे शासनाचे निर्देश काटेकोरपणे पाळून होत आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आंगणेवाडीत येणारे सर्व मार्ग पोलीस बंदोबस्तात सील करण्याचे आदेश यापूर्वीच दिल्याने कडक तपासणीनंतरच आंगणे ग्रामस्थांनाही आंगणेवाडीत प्रवेश मिळणार आहे. राजकीय मंडळी, पत्रकारांनाही यात्रा कालावधीत प्रवेश मिळणार नाही.
कोरोना महामारीचे संकट अजूनही टळलेले नाही. गर्दी टाळण्यासाठी यावर्षीचा यात्रोत्सव साध्या पद्धतीने व मर्यादित स्वरुपात केवळ आंगणे कुटुंबियांच्या उपस्थितीत कोरोनाविषयक नियम पाळून पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे पाहुणे, मित्रमंडळी, यात्रेकरू, पंचक्रोशीतील ग्रामस्थांना विनंती की, त्यांनी 6 व 7 मार्च या दोन्ही दिवशी भराडी मातेच्या उत्सवात सहभागी न होता, जेथे आहेत तेथूनच देवीला नमस्कार करावा व भराडी देवीचा वार्षिक उत्सव आणि सर्व विधी निर्विघ्नपणे पार पाडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आंगणे कुटुंबियांतर्फे मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केले आहे.
देवालय परिसरात दर्शन रांग व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून मंदिरात विविध रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. देवालय परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून गेला आहे. मंदिरात प्रवेश करताना तापमान नोंद घेण्यात येणार असून मंदिर परिसरात दोन वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक पथक 24 तास उपलब्ध असणार आहे. आंगणेवाडी येथील पाणी शुद्धिकरण पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी दिली आहे.
पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला असून जिल्हा पोलीसप्रमुख राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली 21 अधिकारी, 191 पोलीस अंमलदार, 1 बॉम्बनाशक पथक, 1 आरसीपी पथक तैनात असणार आहे. बाहेरील भाविकांना यात्रा कालावधीत प्रवेश नसल्याने आंगणेवाडीतील प्रवेश मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असणार असल्याची माहिती मालवण पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनी दिली.
यात्रोत्सव कालावधीत भराडी देवालय परिसरातील स्थानिक दुकानेही बंद राहणार असल्याने काही प्रमाणात गैरसोय होणार आहे. सुमारे दीड ते दोन किमी परिसरात भरणारी ही यात्रा यावर्षी कोरोनामुळे मर्यादित स्वरुपात भरत असल्याने यात्रेचा फिल अभावानेच येणार आहे. ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमानुसार भराडी मातेच्या सर्व भक्तांनी जेथे असाल तेथूनच देवीला नमस्कार करा. तेथूनच आपले नवस बोला. देवी तुमच्या सर्व मनोकामना निश्चितच पूर्ण करणार. कोणीही भाविकांनी यात्रा कालावधीत आंगणेवाडीमध्ये प्रवेश मिळणार नसल्याने दूरवरून येण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन आंगणे कुटुंबियांनी केले आहे.
यावर्षी प्रथमच आंगणेवाडी यात्रा उत्सवात होणारी अनेक कोटींच्या उलाढालीला कोरोनामुळे ब्रेक मिळाला आहे. अनेक छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. यात्रा मर्यादित स्वरुपात होत असल्याने राज्य परिवहन महामंडळाचेही जिल्हय़ात मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. गेली अनेक वर्षे अंगणवाडीमध्ये डिजिटल बॅनर युद्ध आपल्याला पाहायला मिळत होते. यावर्षी फक्त यात्रा उत्सवाचे केलेले नियम वगळता एकाही राजकीय पक्षाचा बॅनर आंगणेवाडीत प्रथमच पाहायला मिळणार नाहीत. कोरोनामुळे यावर्षी प्रथमच यात्रा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी होत आहे.