कोल्हापूर-सावंतवाडी घाटमार्ग व्हायलाच हवा- बबन साळगावकर
सावंतवाडी /प्रतिनिधी-
शिवकालीन असा माणगाव खोरे येथून आंजिवडे, गारगोटी मार्गे कोल्हापूर असा कमी अंतराचा सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ भागातून जाणारा पर्यायी घाटमार्ग व्हावा आणि या घाटमार्ग कृती समितीला आमचा पाठिंबा आहे. हा घाट मार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला एक नवी दिशा देणारा ठरेल असे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले. आज शनिवारी सावंतवाडी येथे या पर्यायी कोल्हापूर जाणाऱ्या घाट मार्ग रस्त्याबाबत पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला घाटमार्ग कृती समितीचे अध्यक्ष एडवोकेट किशोर शिरोडकर, बाळा सावंत, एडवोकेट सुभाष पणदूरकर, जि. प. सदस्य राजेंद्र कविटकर, आबा केसरकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, सुरेश भोगटे, अफरोज राजगुरू, अभय पंडित, एकनाथ केसरकर, विक्रांत केसरकर, रवी जाधव, साई नार्वेकर आदी उपस्थित होते. यावेळी एडवोकेट शिरोडकर व सावंत यांनी या घाट मार्गासाठी सर्वांनी राजकीय विरहित एकत्र येऊन चळवळ उभारणे आवश्यक आहे असे स्पष्ट केले.