अंनिसच्या प्रयत्नामुळे पलूसमध्ये बहिष्कार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
महाराष्ट्रातील नंदिवाले काशी कापडी या समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अशा अंदाजे 150 जोडप्यांना नंदिवाले जातपंचांनी समाजातून बहिष्कृत केले असून त्यांच्याशी समाजातील कोणीही संबंध न ठेवता बहिष्कार टाकला आहे. अशा आंतरजातीय विवाह केलेल्या तीस जोडप्यांनी एकत्रपणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सातारा यांच्याकडे तक्रार अर्ज देऊन त्यांच्यावरील सामाजिक बहिष्कार उठवण्याची मागणी केली. त्यानुसार अंनिसच्या कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी नंदिवाले समाजातील जातपंचांशी संपर्क करून त्यांची मेढा (जि. सातारा) पोलीस स्टेशनला जून 2021 मध्ये बैठक बोलावली. तसेच पोलिसांनी पंचांना सामाजिक बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली. तेव्हा पंचांनी सामाजिक बहिष्कार मागे घेत असल्याचे कबूल केले. त्यानुसार पंचांची पुढील बैठक 26 डिसेंबर 2021 रोजी कराड येथे होऊन या बैठकीतही राज्यातील आंतरजातीय विवाह केलेल्या कुटुंबांवरील सामाजिक बहिष्कार मागे घेत असल्याचे जाहीर केले.
परंतु नंदिवाले समाजातील काही जातपंचांनी सांडगेवाडी (ता. पलूस) येथे पुन्हा जातपंचायत 9 जानेवारी 2022 रोजी बसविली. या जातपंचायतमध्ये त्यांनी कराड येथे जातपंचायतींनी घेतलेला निर्णय अमान्य करून या आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवरील सामाजिक बहिष्कार सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले.
त्यानंतर आंतरजातीय विवाह केलेले प्रकाश शंकर भोसले यांनी या कायद्यानुसार पलूस पोलीस स्टेशनला दि. 14 जानेवारी 2022 रोजी गुन्हा दाखल केला. यामध्ये जातपंचायतीचे पंच – 1) विलास शंकर भिंगार्डे (इस्लामपूर), 2) चंद्रकांत बापू पवार (इस्लामपूर), 3) शामराव श्रीरंग देशमुख (दुधोंडी), 4) अशोक शंकर भोसले (दुधोंडी), 5) किसन रामा इंगवले (जुळेवाडी, ता. कराड), 6) विलास बापू मोकाशी (नेहरूनगर, निमणी) या पंचांवर सामाजिक बहिष्करविरोधी कायद्यानुसार पलूस पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे. फिर्यादी प्रकाश भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहून जो सामाजिक बहिष्कार टाकला आहे. त्याच्या त्रासाची आपबीती पत्रकारांना सांगितली.
सदर प्रकरणाचा पाठपुरावा करून गुन्हा नोंद करण्यासाठी सातारा अंनिसचे कार्यकर्ते शंकर कणसे, प्रशांत पोतदार, यासह सांगली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजश्री दुधाळ, हवलदार नितीन गोडे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.